भाजप आमदार प्रशांत बंब यांचा राज्यातील पहिला प्रयोग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यात विरावे’ अशी मनोभूमिका असणारा कार्यकर्ता घडावा, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा. या संस्थेला मात्र संस्था मानून काम करणाऱ्या भाजप आमदारांच्या मतदारसंघातील ‘कार्यकर्त्यांचं’ही जग बदलतेय. कसे?-सध्या खुलताबाद तालुक्यात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे छायाचित्र टी- शर्टवर पाठीमागच्या बाजूने घातलेले २० तरुण गावात सकाळीच घुसतात. प्रत्येक कुटुंबाची माहिती, त्यांच्या समस्यांची माहिती गोळा करतात. ती देखील टॅबवर. ६७ प्रश्नांचा संच भरुन होण्यापूर्वी गावात मशाल फेरी काढतात. गावाचा आराखडा बनवतात. या कामासाठी आमदार बंब यांनी ‘आरीत’ नावाच्या एका कंपनीबरोबर एक कोटी रुपयांचा करार केला आहे. खुलताबाद तालुक्यात सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या १०० जणांचा चमू सध्या ग्रामीण विकासाची चावी आमदार बंब यांच्या नावाने फिरवत आहे. ‘कार्यकत्यार्ं’चं हे आऊटसोर्सिग खुलताबाद व गंगापूर मतदारसंघात कौतुकाचा विषय आहे.

सातारा जिल्ह्णाातील अर्चना गुळदगड  ‘आरीत’ या कंपनीत रुजू झाली. ग्रामीण भागातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘पार्टीसेपटरी रुरल अॅप्रायजल’ या प्रणालीद्वारे गावाचे नकाशे तयार केले जात आहेत, समस्या शोधल्या जात आहेत. यासाठी सामाजिक कार्यक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या शंभरजणांचा चमू खुलताबाद व गंगापूर मतदारसंघात काम करतो आहे. ’ टाटा सामाज विज्ञान अकादमीतून उत्तीर्ण झालेला हरियाणाचा मोहीत आर्य, कधीच ग्रामीण भागात न आलेली नागपूरची सुप्रिया बबन शिंगाडे, असे किती तरी मुली-मुले. कोणी समन्वयक तर कोणी आमदार ग्रामविकास सहायक. एमएसडब्ल्यू ही पदवी घेतलेल्या तरुणांना अनुभव मिळावा म्हणून ‘आरीत’ त्यांना बोलावून घेते. त्यांच्या जेवण्याची सोय आमदार बंब यांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी करतात.

या ‘कार्यकर्त्यांची’ राहण्याची सोय खुलताबादमध्ये करण्यात आली आहे. कसे काम करायचे यासाठी समन्वय ठेवणाऱ्यांना १५ हजार रुपये मानधन, मोबाईल, पेट्रोलसाठी पाच हजार रुपये दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी मात्र फक्त राहण्या-जेवण्याची सोय आणि ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव. ‘आरीत’चे प्रमुख अनिल घुगे कन्नड तालुक्यातील. त्यांनी राजस्थानमध्ये अशाच प्रकारचे काम एका आमदरांबरोबर केले आणि आता आमदार प्रशांत बंबसाठी ते काम करीत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची हवा असल्याचे लक्षात आल्यानंतर अपक्ष म्हणून पूर्वी निवडून आलेल्या प्रशांत बंब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार अंबादास दानवे यांच्यापेक्षा सतरा हजार २७८ मते अधिक मिळवून ते विजयी झाले होते. राज्याच्या रोजगार हमी योजनेचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले आहे.  मतदारसंघ बांधणीसाठी आता समाजकार्याच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांंचे आऊटसोर्सिग करुन त्यांनी मतदारसंघात नवीच पद्धत रुढ केली आहे.

चांगल्या कामासाठी प्रशिक्षित माणसे लागतात

‘चांगले काम करण्यासाठी प्रशिक्षित माणसे लागतात. ती मिळत नाहीत. म्हणून मी हे काम चांगल्या व्यक्तींकडून करुन घ्यायचे ठरविले. आता सगळय़ा गावांची आकडेवारी माझ्याकडे येईल. कोणाला नक्की कोणती गरज आहे हे समजेल. त्यानुसार त्याला लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’ अशा पद्धतीने काम करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असेल. यानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या जुन्या व्याख्या आणि संकल्पना मात्र पुरत्या बदलून गेल्याचे दिसून येत आहे. – प्रशांत बंब

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla prashant bamb bjp activists rss
First published on: 12-06-2017 at 03:09 IST