Parinay Phuke Poem on Thackeray Brothers: पहिलीपासून हिंदीसक्ती करण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून ५ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र मोर्चाऐवजी आता विजयी मेळावा घेतला जाणार आहे. मुंबईच्या वरळी डोम येथे होणाऱ्या विजयी सभेवर भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी कवितेमधून खोचक टीका केली आहे. विधानपरिषदेत बोलत असताना त्यांनी कवितेमधून मोर्चावर टीका केली.
डॉ. परिणय फुके म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात त्रिभाषा सूत्र स्वीकारले गेले होते. त्यांच्या काळातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरविला, याबद्दल फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खरंतर ही सभा घ्यायला हवी. यानंतर त्यांनी एक कविता सादर करून ठाकरे बंधूंवर टीका केली.
कविता अशी…
घरात आईला म्हणणार मम्मी
मोर्चामध्ये जाणार आम्ही,
कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण
मराठीचं करणार रक्षण,
सुट्टीसाठी आहे युरोप
दुसऱ्यांवर करणार आरोप
सत्तेसाठी वेगळे झालो
सत्तेसाठीच आता एकत्र आलो,
लाथाडले जनतेने
काय करतील कोण जाणे?
हिंदुत्वाचे कधी दुकान
कधी प्यारे टिपू सुलतान,
कास मराठीची धरली निवडणुकीत केम छो वरळी,
धारावीत दाखवला रुबाब,
लुंगी बहादूर छोटे नवाब,
भारत भर भाराभर चिंध्या
एक ना धड अस्तित्वाची धडपड,
बुडाखालून गेल्या खुर्च्या
म्हणून मराठीचा मोर्चा,
मोडीत कधीच निघाला ब्रँड आता चहूबाजूंनी वाजलाय बँड…
विधान परिषदेत नियम २६० अन्वये सत्ताधाऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर डॉ. परिणय फुके बोलत होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मागच्या सहा ते सात महिन्यात महाराष्ट्राचा विकास होत असल्याचे परिणय फुके यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील वरळीत होणार विजयी मेळावा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांनी एकमेकांना एकत्र येण्याबाबत मुलाखतीच्या माध्यमातून साद-प्रतिसाद दिला. त्यानंतर एकत्र येण्यासाठी निमित्त ठरले ते त्रिभाषा सूत्र. इयत्ता पहिलीपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केल्यामुळे ठाकरे बंधूंनी ५ जुलै रोजी मराठी माणसांचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदर जीआर मागे घेतल्याचे सांगितले.
शासन निर्णय मागे घेतल्यानंतर आता ५ जुलै रोजी मोर्चाचे रुपांतर विजयी मेळाव्यात झाले आहे. सकाळी १० वाजल्यापासून वरळीच्या डोम सभागृहात ही सभा होईल. या सभेचे स्वरुप अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन दशकानंतर एकाच मंचावर येणार असल्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.