शिवसेनेतील बंडाळीनंतर आत्तापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाने काल १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अभय दिल्यानंतर आज तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताकारणाच्या घडामोडी दिल्लीत घडणार का? असा तर्क आता लावला जात आहे. तर दुसरीकडे भाजपा खासदारांकडून येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय पूजा देवेंद्र फडणवीसच करणार, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय राजकीय घडामोडी घडत आहेत? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे दुपारी गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्देशांनुसार १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून अभय देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांचा खोचक सल्ला!

“मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच विठ्ठलाची पूजा करणार”

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा दावा केला आहे. “येत्या दोन-तीन दिवसांत भाजपाचे सरकार येईल. तसेच आषाढी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल” असा गौप्यस्फोट भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. तर सेनेचे १० ते १२ खासदारही तेव्हा सोबत येतील असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Maharashtra Political Crisis Live : “बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर…”, शिवसेनेतील बंडाळीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान!

नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे बंडखोर आमदार यांच्या मदतीने भाजपा सत्तेत येईल”, असं त्यांनी नमूद केलं.

“शिंदेंच्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही”

दरम्यान, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात आल्यावर चित्र बदलेल, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून चिखलीकर यांनी पवारांवर टीका केली आहे. “शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ही भाषा शोभणारी नाही. महाराष्ट्र वेगळ्या आशेनं त्यांच्याकडे पाहातो. पण परवा शरद पवारांनी जे वक्तव्य केलं, ते योग्य नाही. लोकशाही आहे. एकनाथ शिंदे मुंबईतच येतील. त्यांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही”, असं चिखलीकर यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp pratap chikhlikar devendra fadnavis perform pooja on ashadhi ekadashi pmw
First published on: 28-06-2022 at 12:26 IST