मी लग्न करून सासरी गेली, तेव्हा मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले, मला मला लोखंडी रॉडने मला मारण्यात आलं, असा गंभीर आरोप भाजपाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला आहे. आज सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केले. रामदास तडस हे वर्धेतील भाजपाचे उमेदवारही आहेत.

काय म्हणाल्या पूजा तडस?

“खासदार तडस यांच्या मुलाबरोबर माझं लग्न कशाप्रकारे झालं, हे सर्वांना माहिती आहे. स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी आमचं लग्न लावून देण्यात आलं होतं. त्यानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवण्यात आलं. तिथे ज्या वाईट पद्धतीने माझ्याशी वागण्यात आलं. तिथे मला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून ठेवण्यात आलं. त्यातूनच माझ्या बाळाचा जन्म झाला. त्यानंतर हे बाळ कोणाचं आहे? अशी विचारणा करून माझी अवहेलना करण्यात आली. माझ्यावर डीएनए चाचणी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला”, असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे.

हेही वाचा – मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना…

“आज माझं बाळ १७ महिन्यांचं आहे. मात्र, आज एक लोकप्रतिनीधी जर मला डीएनए कर म्हणत असतील, तर समाजातील मुलींनी कोणाकडे बघावं? प्रत्येकवेळी मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले. मी जेव्हा त्यांच्या घरी गेली, तेव्हा लोखंडी रॉडने मला मारण्यात आलं. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहे”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“आज माझ्या बाळाला घेऊन मी अनेक ठिकाणी फिरते आहे. ज्या फ्लॅटवर आम्ही राहत होतो, तो फ्लॅट विकून मला बेघर करण्यात आलं. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याशी वागण्यात आलं. खासदार तडस म्हणतात की त्यांनी त्यांच्या मुलाला घराबाहेर काढलं. मात्र, तरीही त्यांच्या मुलाला ते घरात ठेवतात आणि मला घराबाहेर काढलं जातं”, असेही त्या म्हणाल्या. तसेच एक लोकप्रतिनीधी जर त्यांच्या सुनेला न्याय देऊ शकत नसतील, तर ते समाजाला काय न्याय देतील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेसमध्येही जागावाटपावर नाराजी; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “आमची अपेक्षा होती की किमान…”

“२० तारखेला रामदास तडस यांच्या सभेसाठी मोदींजी वर्धेत येत आहेत. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की मी तुमच्या परिवारातली लेक आहे. त्यामुळे मला न्याय द्या, माझ्या बाळाला न्याय द्या, माझ्या बाळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला वेळ देऊन माझी व्यथा जाणून घ्या”, अशी मागणीही त्यांनी केली.

रामदास तडस यांच्याकडून आरोपांचे खंडन

दरम्यान, पूजा तडस यांच्या आरोपानंतर खासदार रामदास तडस यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना हे आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले. “निवडणुका आल्या की माझ्यावर असे गंभीर आरोप केले जातात. माझ्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. माझ्या मुलगा आणि पूजा यांनी लग्न केलं, तेव्हा आम्हाला याची माहिती नव्हती. पूजा तडस या आमच्याबरोबर राहत नाही. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाले. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे माझं याप्रकरणाशी काहीही घेणं देणं नाही. विरोधकांना हाताशी घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असं ते म्हणाले.