सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपने मोठा राजकीय डावपेच आखला असून, राजघराण्याच्या सौ. श्रध्दा सावंत भोसले यांना उमेदवारी दिली आहे. सौ. भोसले यांनी भाजपच्यावतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सावंतवाडीच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा रंगली आहे.
सौ. श्रध्दा सावंत भोसले यांनी नगराध्यक्ष पदासाठी एकूण तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. भाजपमध्ये या पदासाठी अन्य इच्छुक उमेदवार होते. मात्र, पक्षाने सर्व इच्छुकांना डावलून राजघराण्यातील उमेदवार म्हणून सौ. भोसले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे.
राजकीय वारसा आणि शिफारस:
सौ. श्रध्दा सावंत भोसले यांचा राजकीय वारसा मोठा आहे. त्या सावंतवाडी संस्थानचे शेवटचे राजे आणि माजी आमदार कै. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत. त्यांचे पती लखम सावंत भोसले हे सध्या भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
ऐतिहासिक सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपने मोठा राजकीय डावपेच आखला असून, राजघराण्याच्या सौ. श्रध्दा सावंत भोसले यांना उमेदवारी दिली आहे. सौ. भोसले यांनी भाजपच्यावतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सावंतवाडीच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा रंगली आहे.
— LoksattaLive (@LoksattaLive) November 17, 2025
सौ.… pic.twitter.com/5XAN1SUatn
विशेष म्हणजे, सौ. भोसले यांना उमेदवारी मिळण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि विधानसभा सभापती अँड. राहुल नार्वेकर यांची खास शिफारस असल्याची चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. पक्षातील या दोन बड्या नेत्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी निर्णायक ठरला असल्याचे मानले जात आहे.
ऐतिहासिक लढतीकडे लक्ष: राजघराण्यातील उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवण्याचा भाजपचा हा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यामुळे आगामी निवडणूक लक्षवेधी ठरणार असून, राजकीय वातावरण तापले आहे.
