Ashish Shelar On Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच आगामी महापालिका निवडणुकीवरून मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीचा आरोप करत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत मुंबईत नुकताच ‘सत्याचा मोर्चा’ काढला. या मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मतदार याद्यांमधील दुबार मतदारांवरून थेट खळ्ळखट्याक करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसेच राज ठाकरे यांनी याआधी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत सरकारवर अनेकदा टीका केली होती. त्यानंतर आता भाजपानेही ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत ‘सत्याचा मोर्चा’मधील राज ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ लावत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
आशिष शेलार काय म्हणाले?
“आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला मतदार-मतदारांमध्ये भेद निर्माण करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. मात्र, जे मतदारांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही उत्तर देऊ पाहत आहोत. यातून काही वेगळा अर्थ काढावा अशी आमची भूमिका नाही. मात्र, यातून जे काही आम्हाला दिसून आलं ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत जो काही झटका लागला, तेव्हा दिल्लीतील पप्पूपासून ते गल्लीतील पप्पूपर्यंत सर्वजण जी भूमिका मांडत आहेत, त्याला प्रत्युत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे”, असं आशिष शेलारांनी म्हटलं.
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका पाहिल्या तर असं लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा, म्हणजे ही एक फेक नरेटिव्हची बांधणी आहे. पण या फेक नरेटिव्हला महाराष्ट्रातील जनता केराची टोपली दाखवेल”, असं आशिष शेलारांनी म्हटलं.
आशिष शेलारांनी राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ लावला
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मोर्चात बोलताना म्हणाले की दुबार मतदारांना बडव-बडव बडवा. तसेच ते म्हणाले होते की टेम्पोभर पुरावे आणले. कारण आज इव्हेंटचा जमाना आहे. सध्या सर्वांनाच ‘लाव रे तो व्हिडीओ’ आवडतो. त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की राज ठाकरे नेमकं मोर्चात काय बोलले? कोणाबाबत बोलले? कोणत्या मतदारांबाबत बोलले? हे या व्हिडीओमध्ये ऐका”, असं म्हणत आशिष शेलारांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील दुबार मतदारांबाबत केलेल्या विधानांचा व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला.
राज ठाकरे मोर्चात नेमकं काय म्हणाले होते?
राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील गोंधळावरून निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले. राज ठाकरे म्हणाले होते की, “आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार बोलतायत की याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्षही बोलतोय, कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत. एवढंच नाही, भाजपाचेही लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेंचे, अजित पवारांचेही लोक बोलतायत. अरे मग अडवलं कुणी? मग हे निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर जेव्हा निवडणुका होती, त्यात यश-अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील.”
“हे दुबार-तिबारवाले दिसले तर…”
येत्या निवडणुकांमध्ये जर दुबार मतदार दिसला, तर तिथल्या तिथे बडवून काढा, असं आवाहन राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. “जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा. चेहरे कळले पाहिजेत. जर त्यानंतर हे दुबार-तिबारवाले आले, तर तिथेच फोडून काढायचे. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले होते.
