भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात महादेव जानकरांच्या रासपच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला नितीन गडकरीही उपस्थित होते. पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणात महादेव जानकर यांच्यशी असणाऱ्या भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य केलं. तसेच, महादेव जानकरांनी आयुष्यभर लग्नच केलं नसल्याचा उल्लेख पंकजा मुंडेंनी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला! याशिवाय, पंकजा मुंडेंनी नेत्यांची भूमिका कशी असली पाहिजे यावरही भाष्य केलं आहे.

“सर्व महापुरुषांनी हेच सांगितलंय की मागास वर्गाला पुढे आणणं हे नायकाचं, नेतृत्वाचं काम आहे. ते काम करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला आहे. हे आपल्याला विसरायचं नाहीये. तुमच्याकडे उद्योगपती किंवा इतर कुणीही असू द्या. पण तुमची नजर सगळ्यात शेवटच्या माणसावरच असली पाहिजे”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“काही नाही मिळालं तर ऊस तोडायला जाईन”

दरम्यान, राजकीय आयुष्याबाबतही पंकजा मुंडेंनी यावेळी मिश्किल टिप्पणी केली. “आम्हाला इतर गोष्टींचं वाईट वाटतच नाही. कदाचित आमच्या रक्तातच ते असावं. आम्ही घाबरत तर कुणालाच नाही. आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन उस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. आणखीन काय होईल? आम्हाला काही गमवायचंच नाहीये. आम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची लालसा, आस्था, अपेक्षा नाहीच”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“महादेव जानकरांनी तर लग्नच केलेलं नाही. खूप चांगलं काम केलं त्यांनी. मी तर म्हणेन यामुळे ते नशीबवान आहेत. यामुळे ते समाजासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकतात. कुणीही त्यांच्याकडे गाडी मागणार नाही, घर मागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामुळेच समर्पित भावनेनं काम करू शकतात. त्यांना फक्त या देशाच्या जनतेची देखभाल करायची आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला नेहमी वाटतं, जानकर मला फोन करून म्हणतील, उद्या माझं लग्न आहे!”

“महादेव जानकर आज अशा सुटाबुटात आले, मला तर वाटलं आज लग्नच करतायत की काय. मला नेहमी वाटतं की कधीतरी मला फोन करतील आणि मला म्हणतील उद्या माझं मंदिरात लग्न आहे, तुम्ही या, तुम्ही त्या कार्यक्रमाच्याही अध्यक्ष आहात. मुंडेंच्या निधनानंतर त्यांनी हे जाहीर करून टाकलं की ३१ मे चे त्यांच्या पक्षाचे जेवढे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमांना मीच अध्यक्ष असेन”, अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी पंकजा मुंडेंनी केली.