जालना : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एका शासकीय कार्यक्रमाच्या सार्वजनिक व्यासपीठावर आलेले काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील भाषणे विकासकामांच्या श्रेयावरून भावकी आणि एकमेकांच्या नात्या-गोत्यांवर गेली!

जिल्ह्यातील जाफराबाद येथील पाणीपुरवठा योजना आणि बसस्थानक भूमिपूजनाच्या शासकीय कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासमोर ही जुगलबंदी रंगली. त्यानंतर बावनकुळे यांनीही आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांचे राजकारणात महत्त्व अधोरेखित केले.

रावसाहेब दानवे यांचे पुत्र भोकरदन आणि जाफराबाद भागातील विधानसभा सदस्य आहेत. त्यांचा उल्लेख करून डॉ. काळे आपल्या भाषणात बावनकुळे यांना उद्देशून म्हणाले की, ‘मी आणि संतोष विकासांच्या योजना आणतो आणि त्याच्या बातम्या मात्र रावसाहेबांच्या नावाने छापून येतात! यासाठी रावसाहेब काय करतात? ही भानगड काय आहे? आई-वडिलांचा आदर करावा अशी आपली संस्कृती आहे आणि तिचे पालन केले पाहिजे. परंतु रावसाहेबांनी कपाटाच्या किल्ल्या अद्याप संतोषच्या हातात दिलेल्या नाहीत की काय?

त्यावर उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की, खासदार काळे आणि आमदार संतोष दानवे यांची विकासकामे एका कागदावर लिहून काढा. त्या कार्यक्रमांना आपण जाणार नाही. चिंता करू नका, तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा लहान आहात आणि शेवटी बाप हा बापच असतो! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या सव्वा वर्षात आपण खासदार काळे यांच्यावर टीका केली नाही. परंतु ते हजर असलेल्या एका कार्यक्रमात मात्र विकास कामांच्या मुद्द्यावरून माझ्यावर टीका झाली.

रावसाहेबांच्या या वक्तव्यास काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा संदर्भ होता. त्यावर काळे यांनी तत्काळ ती टीका आपण केली नव्हती तर तुमच्या भावकीने केली होती, असे उत्तर दिले. त्यानंतर मात्र रावसाहेब दानवे आपल्या शैलीत काळे यांना उद्देशून म्हणाले की, तुमच्या आणि माझ्या मामाचे गाव एकच आहे. तुमची आई आणि मामा यांनी मला लहानपणी कडेवर घेतलेले आहे. आपले नाते आहे आणि तुम्ही उपस्थित असलेल्या कार्यक्रमात माझ्यावर कुणी टीका केली तर तुम्हाला चांगले वाटते का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी काळे यांच्या नातेवाइकांसोबतच्या बालपणातील आठवणीही सांगितल्या.

मी काय करू? माझ्या बातम्या येत राहतात. एकदा शेतात गेलो होतो. तेथे अर्जुन खोतकर भेटायला आले होते. परंतु त्यावेळी अकारण बातमी आली. ती माझ्या एका कार्यकर्त्याला मी लाथ मारल्याची. आणखी पाच वर्षे पुरतील एवढ्या कामांसाठी आपण निधी मंजूर करून आणलेला आहे. त्या कामांवर तर मी जाईलच. कुणी माझ्यावर अकारण टीका केली तर मग आपण जहरी नाग आहोत हे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना माहीत आहे. माझी बातमी आल्यावर बडबड करू नका. नाही तर मी अशी टीका करीन की, तुम्हाला समजणारही नाही, असे रावसाहेब दानवे काँग्रेसचे खासदार डॉ. काळे यांना उद्देशून म्हणाले.