सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची ६२ सदस्यांची जंबो कार्यकारिणी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जाहीर केली. युवा, जिल्हा किसान, ओबीसी, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या आहेत.

याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष श्री. महाडिक म्हणाले, की पक्ष संघटन अधिक सक्षम व जनाभिमुख करण्यासाठी ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच आमदार, माजी आमदार व प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी व मोर्चा अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

त्यांनी पुढे सांगितले, या कार्यकारिणीत व मोर्चात अनुभवी नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, युवा, शेतकरी तसेच विविध समाजघटकांचे प्रतिनिधी यांचा समावेश करून पक्ष संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि बूथ स्तरावर पक्षाची बांधणी मजबूत करणे, जनतेच्या प्रश्नांसाठी ठोस भूमिका घेणे आणि भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची अंमलबजावणी करणे हा नवा कार्यकारिणीचा ध्यास असेल. या कार्यकारिणीची उद्दिष्टे प्रत्येक गावापर्यंत संघटनाचा विस्तार करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे. शेतकरी, कामगार, महिला, युवा, व्यापारी व उद्योगपती यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देणे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

युवकांना नेतृत्वाच्या संधी देत डिजिटल माध्यमातून पक्षाची विचारधारा व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे. सर्व समाजघटकांचा समावेश करून सामाजिक ऐक्य व विकास साधणे. आगामी निवडणुकांसाठी सशक्त संघटन उभारून जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला बळकट करणे. यावर भर देण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यांच्यासह ६२ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत नवीन नावांचा समावेश प्रदेशाच्या सुचनेनुसार करण्यात येईल, असे महाडिक यांनी सांगितले. तसेच उर्वरित प्रकोष्ठ, सेलची कार्यकारिणी येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही महाडिक यांनी सांगितले.

दरम्यान, सांगली ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असली तरी अद्याप शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीमध्ये कुणाला संधी मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.