काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याच महिन्यात मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी हे आरोप करताना मतदार यादीतील घोळ समोर आणला, त्यानुसार जिवंत व्यक्तींना मृत दर्शवण्यात आले असून बोगस नावेही यादीत आहेत, काहींची नावे दोन-तीन मतदारसंघातही पाहायला मिळाली. आता, राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपानेही काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तसंच भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही एक पोस्ट केली आहे.
काय आहे केशव उपाध्येंची पोस्ट?
चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असते असे म्हणतात. चोरी करायची आणि चोरी झाल्याचा कांगावाही करायचा ही चोरांची रीत असते. याचे राहूल गांधीची मतचोरी मोहीम हा त्यातलाच प्रकार! मतचोरी विरोधात आवाज उठवणाऱ्या गांधींच्या कॉंग्रेसी पिलावळीनेच त्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत घोळ केल्याचे उघड होत आहे. गांधी घराण्याचे निष्ठावंत आणि राहुल गांधीचे विश्वासू असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मतचोरी विरोधी समितीमधे सामील करून कॉंग्रेसने चोराहाती चाव्या दिल्या.त्यांच्याच मतदार संघांतील मतदारयादीत नवे नवे चमत्कार उघडकीस येत आहेत.
मतदार याद्यांतील गोंधळ, बनावट नोंदणी, आणि एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद.. हे सर्व पाहता, घरातच मतचोरीचा मास्टरप्लॅन घरातच तयार झाला का, याची चौकशी व्हायला हवी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबीयांची एक, दोन नव्हे तर तीन-तीन ठिकाणी नोंदणी, वयात फरक, पत्त्यांचे खेळ. ही निवडणूक प्रक्रियेचा थट्टा नाही तर काय? आणि त्याच व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने मतचोरीविरोधी समिती नेमली आहे? म्हणजे चोराला चोरीच्या वाटा शोधण्याची जबाबदारी देणे
मतचोरी करणारा दरबान!
हे कुटुंबीय आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे
इंद्रजीत पंजाबराव चव्हाण – तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी
१.कराड (बूथ क्र. 120)
२.मलकापूर (बूथ क्र. 189)
३.कुंभारगाव, पाटण (बूथ क्र. 379)
वडिलांचे नाव आणि वय बदलून नोंदणी
आशा इंद्रजीत चव्हाण यांची तीन ठिकाणी नोंदणी, वयात फरक:
१.कराड (वय 47),
२.मलकापूर (वय 46),
३.पाटण (वय 44)
शांतादेवी चव्हाण यांची दोन ठिकाणी नोंदणी:
१.कराड (वय 87)
२.मलकापूर (वय 86)
अभिजीत चव्हाण यांची मलकापूरमध्ये दोन पत्त्यांवर नोंदणी:
१.आगाशिवनगर
२.इंद्रप्रस्थ कॉलनी
राहुल विजयसिंह चव्हाण आणि गौरी राहुल चव्हाण यांची
१.पाटण कॉलनी
२.कुंभारगावमध्ये नोंदणी, वयात फरक
अधिकराव आण्णासाहेब चव्हाण यांनी वडिलांचे
१. ‘अण्णासो’ आणि
२.’अण्णासाहेब’ असे दाखवून दोन ठिकाणी नोंदणी. अशी पोस्ट केशव उपाध्येंनी केली आहे.
अतुल भोसलेंचा आरोप काय?
पाटण कॉलनीतील एका घराच्या पत्त्यावर १५ मतदार नोंदणीकृत, त्यापैकी अनेकजण त्या ठिकाणी राहत नाहीत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात दुबार, तिबार मतदान नोंदणी झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार नोंदणी करून २०१४, २०१९ ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपाचे पदाधिकारी विद्यमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘व्होटचोरी’ कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केल्याचेही अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अतुल भोसलेंनी जे आरोप केले आहेत, त्यातून खरे वोट चोर कोण हे समोर आलं. याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.