नाशिकरोड भागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्यावरून आज(मंगळवार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. यावेळी संतप्त शिवसेना नगरसेवकांनी भाजपा, पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. भाजपा नगरसेवकांनी त्यास विरोध केला. त्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने, सभेचे कामकाज काही काळ थांबवावे लागले. आता, नाशिकरोडच्या पाणी पुरवठ्याच्या विषयावर बुधवारी तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा झाली. नाशिकरोड भागातील दुषित पाणी पुरवठाचा प्रश्न गाजला. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नाशिकरोड भागातील नगरसेवकांनी या विषयाकडे लक्ष वेधले. काही दिवसांपासून नाशिकरोड भागात दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यावर तातडीने काय उपाययोजना करणार, असा प्रश्न संबंधितांकडून उपस्थित करण्यात आला. महापौरांनी काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला होता. चेहडी बंधाऱ्यातून दुषित पाणी पुरवठा होऊ नये, अशी सूचना देऊनही प्रशासनाने पाणी पुरवठा केल्याकडे सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी लक्ष वेधले. पाणी पुरवठा विभागास जाब विचारला गेला.

परंतु, महापौर प्रतिसाद देत नसल्याने शिवसेना नगरसेवक महापौर ज्या दालनातून ऑनलाईन सभा संचलित करत होते तिथे धडकले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केला. काही वेळात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांनी तिथे धाव घेतली. काही नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या देऊन घोषणाबाजी सुरू केली. यावेळी महापौर उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोंधळामुळे सभेचे कामकाज १० मिनिटे तहकूब करीत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. नगरसेवकांनी महापौरांनी उत्तर द्याावे, अशी घोषणाबाजी सुरू ठेवली. दालनातील गोंधळामुळे महापौर कसेबसे बाहेर पडले. नंतर शिवसेना नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावर ठेवलेला राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या सदस्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे राजदंडावरून काही काळ सेना-भाजपच्या सदस्यांमध्ये खेचाखेची सुरू होती. यामुळे पालिकेचे अधिकारी दालनाबाहेर निघून गेले. भाजपाचे सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदिश पाटील यांनी शिवसेनेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

नाशिकरोडच्या पाणी पुरवठ्याकरिता १८ कोटी रुपये खर्चाची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे शिवाजी चव्हाण यांनी दिली. काही वेळाने गोंधळ थांबल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. नाशिकरोड भागातील पाणी पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पदाचा कार्यभार शाखा अभियंत्याकडे सोपविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. या प्रश्नावर बुधवारी तातडीने बैठक बोलाविण्यात येणार आहे.
तर, गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना महापौरांनी सुनावले आहे. नाशिकरोडवासीयांना शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत. गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र ते नाशिकरोड येथील जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामाच्या निविदा प्रसिध्द झाल्या असून ते काम लवकरच सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena clash in nashik municipal corporation meeting over contaminated water supply msr
First published on: 19-01-2021 at 18:46 IST