राज्यात मागील काही दिवसांपासून महापुरुषांबाबत राजकीय नेते मंडळींकडून जी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे, त्यावरून राजकीय वातावरण चांगलाच तापताना दिसत आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधी पक्षांमधील नेते अशी विधानं करताना दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी, भाजपा प्रवक्ते त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, नुकतच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी राजेंबाबतचं केलेलं विधान आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या वादग्रस्त वक्तव्यांच्मया मालिकेत आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका विधानाची भर पडली आहे. यावरून भाजपावर विरोधकांची टीका सुरू होताच, चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा प्रसारमाध्यमांसमोर निषेध करत असताना, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे… त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत.” असं ते हिंदीमधून बोलताना त्यांनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

यावर खुलासा करताना बावनकुळेंनी म्हटलं की, “क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘ जी ‘ म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच!. क्रूरकर्म्या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना, पत्रकाराने हिंदीतून प्रश्न विचारला. या प्रश्नाला हिंदीतून उत्तर देत असताना मी ‘जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबजी ला क्रूर मानत नाहीत‘असे उपरोधाने म्हटले.”

याशिवाय, “क्रूरकर्मा औरंग्या हा आव्हाड यांच्यासाठी ‘ जी‘ आहे, असे मला म्हणायचे होते. पापी औरंग्याला मी कशाला जी म्हणू? यातील उपरोध जर या लोकांना कळत नसेल, तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढे कमीच आहे.” असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर “आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना ठावूक आहे. औरंग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रद्धास्थान आहे हे आव्हाड्यासारख्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. आम्हाला नसत्या शब्दच्छलात अडकवून स्वतः ला शुद्ध व स्वच्छ असल्याचे दाखवू नका. औरंग्याचे आणि तुमचे नाते जगाला ठावूक आहे.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर बावनकुळे यांनी टीकाही केली.