राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. एकीकडे विरोधकांनी निलंबित आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केलेली असताना दुसरीकडे राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी राज्य सरकारला अद्याप मंजुरी दिलेली नसल्याने त्यावरूनही राजकारण सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी रामायण, महाभारतातलं उदाहरण देखील दिलं आहे.

“चेहरा लोकशाहीचा, ह्रदय हुकुमशाहीचं”

“अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आम्ही वर्षभर आग्रही होतो. पण सरकारच्या मनात काय बेईमानी होती, माहिती नाही. १२ आमदारांबाबत आम्ही विनंती करत होतो. लोकशाहीच्या मार्गाने राज्य न चालवता चेहरा लोकशाहीचा आणि ह्रदय हुकुमशाहीचं असा प्रयत्न तुम्ही करत आहात. पण १२ आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. तो पवित्र अधिकार आहे. घटनेत तुम्हाला मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून निवडणूक घेता येत नाही. तुम्ही निवडणूक घ्या, ८ दिवस अजून अधिवेशन वाढवा. कदाचित आम्ही या निवडणुकीत तुमच्या बाजूनेच उभे राहू. शेवटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा कोणताही हट्ट नाही. लोकशाहीची परंपरा खंडीत न करणारा, सर्वांना न्याय देणारा, जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर असणारा, निर्देश देऊन राज्य सरकारला दिशा देणारा अध्यक्ष हवाय”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“देव त्यांना सद्बुद्धी देवो”

दरम्यान, विधानभवनात एबीपीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावरून सरकावर खोचक निशाणा साधला आहे. “देव त्यांना सद्बुद्धी देवो. शेवटी हट्ट रावणालाही मानवणारा नव्हता, दुर्योधन-दु:शासनालाही मानवणारा नव्हता. भगवान कृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले, तेव्हा दुर्योधन म्हणाला मी सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन देणार नाही. आता त्याची नॅनो कॉपी सरकार करत असेल, तर या सरकारला सुद्धा त्या महाभारतात पांडवांना सोडणाऱ्या कर्णाचा जसा पराजय झाला, तसं इथेही दुर्योधन-दु:शासनासारखं सरकार वागायला लागलं आणि पांडवांसोबतचा कर्ण तिकडे गेला असेल, तर कृष्णाचा अवतार असलेली जनता त्यांना पराभवाचा झटका दिल्याशिवाय राहणार नाही”, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रपती सोडा, सर्वोच्च न्यायालयच म्हणेल…”

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या चर्चेवर देखील मुनगंटीवार यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “नरेंद्र मोदी इतके सहनशील आहेत, की लोकशाहीच्या मार्गानेच एखाद्याचा पराभव व्हावा, कायद्याची चोरवाट वापरू नये असं त्यांचं तत्व आहे. या सरकारने आत्तापर्यंत ९८ वेळा घटनाबाह्य वर्तणूक केली आहे. मला भिती वाटते की या केसेस घेऊन उद्या सर्वोच्च न्यायालयात कुणी गेलं, तर राष्ट्रपती सोडा, सर्वोच्च न्यायालय देखील म्हणू शकेल की राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यात योग्य परिस्थिती आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.