प्रशांत देशमुख, वर्धा
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने बडय़ा कुटुंबातील नव्या चेहऱ्यांनी घेतलेला पुढाकार व त्यास जेष्ठ नेत्यांचे समर्थन चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या चेहऱ्यांमूळे प्रस्थापितांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेनिमित्याने जिल्हय़ातील चारही मतदारसंघांना भेट दिली. पण आर्वी व देवळी मतदारसंघात यात्रेस मिळालेला प्रतिसाद नजरेत भरला. मुख्यमंत्री विश्राम भवनावर मुक्कामी असताना या बाबीची विशेष नोंद घेण्यात आली. या दोनही मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार असल्याने या जागा हिसकावून घेण्याचे वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. देवळी-पुलगावात काँग्रेसचे रणजीत कांबळे यांचा चांगलाच जम बसला आहे. जिल्हय़ातील या एकमेव जागेवर भाजप-सेनेला कधीही यश मिळालेले नाही. ज्येष्ठ नेत्या प्रभा राव व त्यानंतर रणजीत कांबळे यांनीच पकड ठेवली. १९८० ला काँग्रेसचे माणिकराव सबाने व १९९० ला जदच्या श्रीमती सरोज काशीकर प्रभाताईंचा पराभव करीत निवडून आले होते. हा अपवाद वगळता काँग्रेसच्या ताब्यातील देवळी मतदारसंघास विरोधकांना छेद पाडता आला नाही.
यात्रेनिमित्य या मतदारसंघातील आर्वी ते देवळी या पटय़ात वैभव काशीकर यांचे प्रभुत्व दिसून आले. अंकुर सिड्सचे अध्यक्ष रवी काशीकर व माजी आमदार सरोज काशीकर यांचे पुत्र असलेले वैभव काशीकर हे उपक्रमशील व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी एकदा शेतकरी संघटनेतर्फे निवडणूक लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र आता यात्रेनिमित्त त्यांचा राजकीय प्रवेश चर्चेत आला आहे. यापूर्वी सरोज काशीकर यांना भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर आली होती. त्यांनी नाकारली. नंतर भाजपने संघटनानेते शरद जोशी यांना राज्यसभेवर घेतानाच वाजपेयी सरकार असतांना कृषी टास्क फोर्सचे अध्यक्षपद सोपविले होते. काशीकर कुटुंबाचे भाजपशी असे पूर्वीही सख्य राहिले आहे. राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने वैभव काशीकर यांचे नाव यात्रेनिमित्ताने पुढे आणले. आपण देवळी मतदारसंघातून उभे राहण्यास इच्छुक असून वरिष्ठ भाजपने त्यांना आपली भूमिका सांगितली आहे. देवळीकर म्हणून काशीकर कुटुंबाचे इथे विविध उपक्रम असून हजारो शेतकरी या उपक्रमाशी जुळले आहे, असे मत वैभव काशीकर यांनी व्यक्त केले.
आर्वी मतदारसंघात नव्या चेहऱ्यास संधी देण्याची भाजप वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यात्रेवेळी संभाव्य उमेदवारांची चांगलीच लगबग दिसून आली. माजी आमदार दादाराव केचे आर्वीत तर सुधीर दिवे व राहुल ठाकरे महामार्गावर यात्रेची धुरा सांभाळून होते. केंद्र सरकारच्या ‘मिशन सोलर चरखा’ या उपक्रमाचा आरंभ आष्टीतून झाला आहे. राहुल श्रीधरराव ठाकरे यांनी ही कल्पना ग्रामीण भागात रुजविल्याची माहिती झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल ठाकरे यांची संबंधित मंत्रालयाशी भेट घडवून आणली होती. तीन वर्षांपूर्वीच्या या घडामोडीनंतर मध्यम व लघू मंत्रालयाने या उपक्रमासाठी पाचशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद केली. शहीद दिनानिमित्त आष्टीत झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या कार्याचा केलेला गौरव पक्षात अस्वस्थता निर्माण करून गेला. संभाव्य उमेदवारीबाबत विचारणा केल्यावर राहुल ठाकरे म्हणाले की, आपण आगामी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. सौर चरखा व बचतगटाच्या माध्यमातून केलेले काम तसेच तरुण संत्रा उत्पादकांसाठी आयोजित केलेली शिबिरे हा आपला आधार आहे.
उमेदवारांची गर्दी
सर्वाधिक संभाव्य उमेदवारांची गर्दी भाजपमध्ये असून प्रत्येक स्पर्धक श्रेष्ठीच्या पाठिंब्याचा दावा करतो. नव्यांना संधी देण्याची भूमिका ज्येष्ठ नेते वारंवार मांडतात. निवडून येण्याची शक्यता हा निकष आहेच. या पाश्र्वभूमीवर बडय़ा कुटुंबातील नवे चेहरे यात्रेनिमित्ताने चांगलेच आघाडीवर आल्याचे चित्र आहे.