हिंमत असेल तर समोरासमोर या, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या असे खुले आव्हान उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता दिले आहे. “माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करता, पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. खंडणी, टक्केवारीची भाषा करता, पण हिंमत असेल तर समोरासमोर ईडीच्या चौकशीला आपण दोघेही सामोरे जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या,” असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत याचे कारण सांगत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंवर आरोप केले होते. सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी नेत्यांमुळे रखडला आहे. टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असे सांगत अजित पवारांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे त्यांच्याकडे आलेला व्हीडिओ देत चौकशी करण्याची सूचना केली होती. यावर उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात प्रतिक्रिया दिली.

“माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील; त्याचे मला काहीही घेणे देणं नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. लाख, दोन लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप करण्याची काय पद्धत झाली काय,” अशी विचारणा उदयनराजेंनी केली.

साताऱ्यात एमआयडीसीची स्थापना झाली त्यावेळी मी तर शाळेत होतो, त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले की, ज्यावेळी सातारच्या एमआयडीसीला परवानगी दिली त्यावेळी अन्य जिल्ह्यात एमआयडीसीची परवानगी दिली. तेथील परिस्थिती आज किती चांगली आहे. मग साताऱ्याची दयनीय अवस्था झाली त्यासाठी जबाबदार कोण आहे?. तुमची पण जबाबदारी होती ना? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, उपमुख्यमंत्री आहात. त्यावेळी तुम्ही पालकमंत्री मंत्री होतात. त्यावेळचे आमदार, खासदार यांची पण जबाबदारी होती , त्यांनी लक्ष का दिले नाही,” असा प्रश्न त्यांनी विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एखादा चांगले काम करत असेल तर त्याने कामच करायचे नाही का? अशी विचारणा उदयनराजेंनी केली. “तुम्ही काम करा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचेही काम आहे. हे लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही त्यांना ओळख देत नाहीत. पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल,” असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली.

“एमआयडीसीत जागा विकत घ्यायची, विविध सुविधांसाठी जागा आरक्षित असेल त्याव्यतिरिक्त प्लॉट विकत घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाकडून परवानगी आणून तिचे निवासी जागेत रूपांतर करून गृहप्रकल्प बांधायचे असे प्रकार यांनी केले. आता माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करत आहेत,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.