भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या पार्श्र्वभूमीवर सुभाष देशमुख यांनी सध्या पक्षात आपल्याकडे पक्षाचे कोणतेही काम नसल्यामुळे पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
उस्मानाबाद लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे असून सेनेचे प्रा. रवि गायकवाड हे उमेदवार आहेत. परंतु ही जागा भाजपला सोडावी म्हणून देशमुख यांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु त्यास यश आले नाही. त्यातच त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी बंडखोरी कायम राखल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. या बंडखोरीमुळे उस्मानाबाद व सोलापूर या दोन्ही ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. उस्मानाबादचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत सोलापुरात भाजपचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारात भाग घ्यायचा नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर सुभाष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी दर्शवत प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात सोलापूर श्रमिक पत्रकार संघातील वार्तालाप कार्यक्रमात पक्षश्रेष्ठींवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाला जेव्हा वाईट दिवस येतात, तेव्हा चांगल्या कार्यकर्त्यांना कामाची संधी मिळते. परंतु जेव्हा पक्ष चांगल्या स्थितीत असतो, तेव्हा चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, अशा शब्दांत खंत व्यक्त करताना देशमुख यांनी सध्या आपण पक्षात गरिबीचे दिवस कंठत असल्याची भावना बोलून दाखवली होती. देशमुख यांनी १९९७ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर विजय मिळवताना ‘देशमुख पॅटर्न’ची चर्चा रंगली होती. त्यानंतर २००४ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा धक्कादायक पराभव करून संपूर्ण राज्यात खळबळ माजवली होती. मागील २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत देशमुख यांनी माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी लढत दिली होती. लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून देशमुख यांची ताकद दिसून येते.