सत्ता, पैसा आणि राज्यपाल कार्यालयांचा वापर करुन भाजपा देशाच्या विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे कृत्य घटनेच्या विरोधातलं असून लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधान आणि लोकशाही परंपरांना पायदळी तुडवत राजस्थानचे राज्यपाल लोकनियुक्त सरकार पाडण्यासाठी भाजपला मदत होईल अशा प्रकारे वागत आहेत. त्याच्या विरोधात आज सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या राजभवनासमोर आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकारचा आणि राज्यपालांचा निषेध केला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार मधु चव्हाण, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा- लोकनियुक्त सरकार पाडणं हा भाजपाचा अजेंडा; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

पडत्या पावसात काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. पण २०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप सातत्याने जनमताचा अनादर करत आहे. सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षाची लोकनियुक्त सरकारे पाडणे व अनैतिक व भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवणे हीच भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. त्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयांचा म्हणजे राजभवनांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. अनेक राज्यातील सरकारे पाडण्याची षडयंत्रे राजभवनावर शिजली आहेत.

आणखी वाचा- महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी तयारीला लागा, केंद्रातून आदेश

राजस्थानात राज्यपालाची भूमिका संशयास्पद आणि पक्षपातीपणाची आहे. अशोक गहेलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पण आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी भाजपाला अवधी मिळावा म्हणून राज्यपाल अधिवेशन बोलवत नाहीत असा आरोप करून राज्यपाल संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत आहेत असे थोरात म्हणाले. राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली वागत आहेत. राजभवनं राजकारणाचे अड्डे बनली आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps attempt to assassinate democracy by using power money and governors office says congress scj
First published on: 27-07-2020 at 16:20 IST