Praveen Gaikwad News: संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला आहे. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर काळी शाई टाकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांनी आता या हल्ल्यावर टीका केली आहे.

ही शेवटाची सुरुवात…

दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी या घटनेवर आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझ्यावर अचानकपणे हल्ला करण्यात आला. मला मारहण्याचाही प्रयत्न केला गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, डॉ. गौरी लंकेश यांच्या हत्या याआधी याच विचारसरणीच्या लोकांनी केली होती. आता याच विचारसरणीने माझ्यावरही हल्ला केला आहे. आमचा विचार राज्यघटनेला अभिप्रेत असलेला आहे. देशात मानवता प्रस्थापित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड काम करत आहे आणि करत राहिल. मी एवढेच म्हणेण ही शेवटाची सुरुवात आहे. आज माझ्या हत्येचा प्रयत्न केला गेला. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.”

म्हणून मी आज जिवंत…

प्रवीण गायकवाड पुढे म्हणाले की, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि बहुजन समाजामुळे मी आज जिवंत आहे. पुढील काळात काहीतरी चांगले काम करण्याची संधी असल्यामुळेच मला नवीन संधी मिळाली आहे.

पुरोगामी चळवळीतील नेते, व्याख्याते, लेखक म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला आहे. अक्कलकोट येथे एका सत्कारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असताना शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी त्यांच्या गाडीचेही नुकसान करण्यात आले तसेच त्यांचे कपडेही फाडण्यात आल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

अक्कलकोटमधील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड आले आहोते. यावेळी गाडीतून उतरल्याबरोबर काही जणांनी अचानक त्यांच्या डोक्यावर शाई ओतली. यानंतर प्रवीण गायकवाड यांनी गाडीकडे धाव घेत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गाडीतून खेचत बाहेर काढण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी सदर व्हिडीओ शेअर करत गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्यामुळे सदर हल्ला करण्यात आल्याचे कळते. शिवधर्म फाऊंडेशनने याआधीही या नावावर आक्षेप घेतलेला होता. सदर हल्ला झाल्यानंतर फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, युवकांचे भविष्य घडवण्यासाठी सातत्याने अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण गायकवाड. अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलिया या उपक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाजातून प्रविणदादांनी अनेक उद्योगपती घडवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यातील तरुणांना उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या अशा व्यक्तिमत्वावर भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करू तितका कमीच आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र हा वैचारिक विरोध विचारांनीच करायला हवा. हिंसेचा हा मार्ग अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे”, या शब्दांत त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.