पाथर्डी तालुक्यातील आलनवाडी गावाजवळील काकडदरा तांडय़ावरील राजू तुळशीराम पवार (वय ४२) या अंध इसमाने बुधवारी दुपारी राहत्या घरीच जाळून घेऊन आत्महत्या केली. त्याची आई भानाबाई (वय ६०) यांनीही नंतर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्या अत्यवस्थ आहेत. आर्थिक विवंचनेमुळेच या मायलेकांनी ही कृती केल्याचे सांगण्यात येते.
बुधवारी दुपारी ही घटना घडली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कृष्णा जोपाळे यांनी या तांडय़ाला भेट देऊन पाहणी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की राजू पवार याने दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वत:स जाळून घेतले. यात तो भाजून गंभीररीत्या जखमी झाला होता. याच वेळी त्याच्या आईनेही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने शेजारील लोकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच रुग्णवाहिका बोलावून या मायलेकांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र राजू याचे तत्पूर्वीच निधन झाले होते. त्याची आई भानाबाई अत्यवस्थ असल्याने त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
राजू हा दोन्ही डोळय़ांनी अंध असून तो विवाहित आहे. त्याला दोन मुलीही आहेत. घटना घडली त्या वेळी त्याची पत्नी शेतात गेली होती व दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. या मायलेकांनी आर्थिक विवंचनेला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे बोलले जाते. राजू याचे वडील तुळशीराम पवार यांनीही वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blind committed suicide
First published on: 16-07-2015 at 03:43 IST