नाशिक महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासमोर बुधवारी दुपारी गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने त्वरित कारवाई करून तो बॉम्ब निकामी केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
राजीव गांधी भवन या महापालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या काही दुकानांच्या बाहेर पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. परिसरातील व्यक्तींना या खोक्याबद्दल संशय आल्यावर त्यांनी पोलीसांना कळविले. त्यानंतर पोलीस आणि बॉम्बनाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खोक्यामध्ये बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी तो मोकळ्या जागेत नेवून निकामी केला.
या घटनेनंतर महापालिका परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. बॉम्ब कोणी ठेवला, याचा शोध पोलीस घेत आहेत.