प्रशांत देशमुख
वर्धा : जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची चर्चा सातत्याने होते. मात्र, वाघाचे दर्शन अभावानेच होत असल्याचे निराश पर्यटक सांगतात. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ‘कॅटरिना’ वाघीण व तिच्या एक वर्ष वयाच्या दोन शावकांचे गत काही दिवसांपासून दर्शन होत असल्याचे उघडकीस आले आहे.
एका नशीबवान पर्यटकाने ‘कॅटरिना’च्या भ्रमंतीची चित्रफीत काढल्याने ही बाब पुढे आली आहे. ही चित्रफीत जुनी नसून नवीन असल्याचे बोर उपविभागीय वन अधिकार निलेश गावंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कॅटरिना वाघीण पिल्लासह भ्रमंतीवर असून या महिन्यात आम्ही अनेकवेळा ही भ्रमंती पाहल्याचे ते म्हणाले. उन्हाच्या काहिलीमुळे वाघ पाण्याच्या शोधात उघड्या प्रदेशात भटकतात. माणोली शिवारात कॅटरिना आपल्या कुटुंबकबिल्यासह ‘गस्त’ घालत आहे.