मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचा प्रकार समोर आल्याने, यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. भाजपा नेते या मुद्द्यावरून आता निशाणा साधताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकारवर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आता कळले..ठाकरे सरकार मधील काही मंत्री..गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात.. झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?” असं आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “मंत्रालयात दारूच्या बाटल्या! हे माझ्यासाठी अजिबात धक्कादायक नाही. नाईटलाईफ गँगचा मंत्री तिथं राहतो, तर नक्कीच तिथे पार्टी…दारू आणि बरचं काही असणार… आता मंत्रालयात येणाऱ्याची करोना तपासणी करण्या अगोदर, पेंग्विन गँगपासून सुरूवात करत प्रत्येकाची अल्कोहल टेस्ट का केली जाऊ नये?” अशा शब्दात नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

तर,“महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. अशी मागणी केली आहे.

मंत्रालयात दारूच्या बाटल्या! ; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले…

“मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोविड परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिति उभी आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात?” असा सवाल दरेकरांना केला आहे.

याचबरोबर, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे, ”मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षा असलेल्या वास्तुत दारूच्या बाटल्यांचा खच आढळून येतो, ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी शरमेची आहे. राज्य सरकारने याची तत्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी.” असं फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण –

सर्वसामान्यांना तपासणी शिवाय सहजासहजी प्रवेश न मिळणाऱ्या राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचे विशेष वृत्त एबीपी माझाने दिले आहे. मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे दाखवले गेले आहे. हा प्रकर समोर आल्यानंततर एकच खळबळ उडाली असून, मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपसाणी केली जात असातनाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय, मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. तसेच, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bottles of liquor in the ministry bjp mla nitesh rane criticized thackeray government msr
First published on: 10-08-2021 at 17:12 IST