Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी मित्रांबरोबर तामसा रोडवरील एका लॉजवर गेल्या होत्या. त्यापैकी एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेली असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच भाऊही आपल्या दोन मित्रांसह तिथे पोहचला. बहिणीला एका तरुणाबरोबर पाहताच भावाचा संताप अनावर झाला. आणि त्याने त्याठिकाणीच वाद घातला.

या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. भावाला खोलीत आलेले पाहून घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिच्या हाताला जबर दुखापत झाली असून तो फ्रॅक्चर झाला. दरम्यान, भावाने आणि त्याच्या मित्रांनी बहिणीच्या मित्राला लॉजमधून बाहेर ओढत नेले. भोकर फाट्यानजीक मित्राला माराहण करत त्याच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले.

जखमी झालेल्या मित्रावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकारानंतर तीनही तरूणींनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. पीडित तरुणीने तक्रार देत सांगितले की, तीन तरूणांनी त्यांना बळजबरीने लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत तसेच जातीवाचक शिवीगाळ करत लॉजवर नेल्याचे तरूणींनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीवरून तीन तरूणांविरोधात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्या तरूणाला भोसकण्यात आले, त्याच्या तक्रारीवरून अल्पवयीन भावासह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली. दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सदर प्रकरणातील घटनाक्रमामुळे जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.