अमरावती जिल्‍ह्यातील चांदूर रेल्‍वे येथील रेल्‍वे क्रॉसिंगवर मालखेडहून येणारी एसटी महामंडळाची बस बंद पडली. तेव्‍हा रेल्‍वे फाटक खुले होते. बस चालकाने बस सुरू करण्‍याचा प्रयत्‍न केला, पण ती सुरू होईना. बसमध्‍ये मोजकेच प्रवासी. प्रवाशांनी खाली उतरून बस ढकलून पाहिली, पण ती इंचभरही पुढे सरकेना. दुसरीकडे, पुणे-काझिपेट एक्‍स्‍प्रेसची वेळ झालेली. त्‍यामुळे फाटकावरील रेल्‍वे कर्मचा-यांची तगमग वाढली. अखेरीस काझिपेट एक्‍स्‍प्रेस फाटकाजवळ थांबवण्‍यात आली आणि दुसरी एसटी बस बोलावून दोरीच्‍या सहाय्याने बंद पडलेली बस रेल्‍वे रुळांवरून हटविण्‍यात यश मिळाले. पण, तोवर काझिपेट एक्‍स्‍प्रेसचा तब्‍बल अर्धा तास खोळंबा झाला.

चांदूर रेल्‍वे आगाराची एसटी बस मालखेडहून चांदूर रेल्‍वेकडे येत असताना आज (शनिवार) सकाळी ही घटना घडली. ही बस सकाळी १०.३० वाजताच्‍या सुमारास चांदूर रेल्‍वे नजीकच्‍या रेल्‍वे क्रॉसिंगवर पोहचली. तेव्‍हा रेल्‍वे फाटक खुले असल्‍याने बसचालकाने रेल्‍वे मार्ग ओलांडण्‍याचा प्रयत्‍न केला, पण बस मध्‍येच बंद पडली. बरेच प्रयत्‍न करूनही बस सुरू होत नसल्‍याचे पाहून बस ढकलून रेल्‍वे मार्ग ओलांडण्‍याचा प्रयत्‍न प्रवाशांनी करून पाहिला, पण त्‍यात त्‍यांना यश मिळाले नाही. दुसरीकडे, पुण्‍याहून येणा-या २२१४१ पुणे-काझीपेट एक्‍स्‍प्रेसची वेळ झालेली असल्‍याने रेल्‍वे फाटक बंद करायचे होते. पण, अडचण ओळखून रेल्‍वे फाटकावरील कर्मचा-यांनी ही माहिती लगेच रेल्‍वे प्रशासनाला कळवली. त्‍यानंतर काझीपेट एक्‍स्‍प्रेस रेल्‍वे फाटकापासून काही अंतरावर थांबविण्‍यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकारामुळे एक्‍स्‍प्रेसचे वेळापत्रक कोलमडले –

एसटी बस बंद पडल्‍याची माहिती चांदूर रेल्‍वे बसस्‍थानक प्रमुखांना देण्‍यात आली, त्‍यानंतर ही बस पुढे काढण्‍यासाठी आणखी एक बस पाठविण्‍यात आली. या बसला दोरी बांधून बंद पडलेल्‍या बसला रेल्‍वे मार्गावरून हटविण्‍यात आले आणि नंतर पुणे-काझीपेट एक्‍स्‍प्रेस पुढे रवाना झाली. या प्रकारामुळे एक्‍स्‍प्रेसचे वेळापत्रक कोलमडले. इतरही प्रवासी गाड्यांच्‍या वाहतुकीवर परिणाम झाला.