सातारा : शहर परिसरात दुचाकीवरून गांजा घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) एकाला पकडले. अतुल धनाजी भगत (वय २७, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संशयिताकडून २ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, की एलसीबीच्या पथकाला साताऱ्यात गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. दुचाकीवरून (एम.एच.११ डी.सी ८२७८) हा संशयित गांजा घेऊन जाणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून शहरात सापळा लावला.
संबंधित दुचाकीस्वारास ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याच्याजवळील पोत्यामध्ये गांजा आढळून आला. या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत २ लाख ६५ हजार ५०० रुपये होत आहे. पोलिसांनी दुचाकी, गांजा जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, विशाल पवार, सचिन ससाणे या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.
जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे व अफूची झाडे अशा एकूण ४४ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांमध्ये २ कोटी ३९ लाख ३३ हजार १७० रुपये किमतीचा १ हजार ६७.१२९ किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.