नांदेड : तीन अपत्य असल्याने तुमच्याविरुद्ध तक्रार करून नोकरी घालवू, अशी धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ५० हजारांची खंडणी घेताना एका महिलेला रंगेहात पकडले.

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागणारे, चोरी, घरफोडी तसेच अवैध व्यवसाय चालविणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. मुखेड तालुक्यातील वसूर येथील धोंडिबा रामराव मुळे (वय ५२) हे भारतमाता ग्रामीण विकास माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षक आहेत. त्यांना तीन अपत्य असल्याने माहिती अधिकार समितीच्या राज्य अध्यक्षा वैशाली गुंजरगे, प्रशांत मुळे व अन्य दोघांनी तुम्हाला तीन अपत्ये असल्याने तुमची नोकरी घालवू, तुम्हाला जेलमध्ये पाठवू, अशी धमकी देत १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून खंडणी मागण्याचा हा प्रकार सुरू होता. २३ एप्रिल रोजी या प्रकरणात धोंडिबा मुळे यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वर्कशॉप परिसरातल्या एका ज्यूस सेंटरवर ५० हजार रुपयांची खंडणी घेताना वैशाली कृष्णा गुंजरगे हिला ताब्यात घेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, जमादार विशाल माळवे, गजानन किडे, सविता केळगेंद्रे, अदनान खान पठाण, सविता बाचेवाड यांनी ही कारवाई बजावली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक हे करत आहेत. भाग्यनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले असून, फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.