राहाता : वयाची खात्री न करता अल्पवयीन मुलीस हॉटेल खोली दिल्याने शिर्डीतील हाॅटेलचालक व मालक या दोघांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाॅटेलच्या व्यवस्थापकास अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली. सदर हॉटेल हे नाशिक जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याच्या मालकीचे आहे.
संतोष भाऊसाहेब गव्हाळे (रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे अटक करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. शिर्डीतील हॉटेल बाबाज् पॅलेसचा व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब गव्हाळे याने अल्पवयीन मुलीस व तिच्या सोबतच्या मुलास हॉटेलमधील खोली ही कोणतेही कागदपत्रे न घेता व मुलीच्या वयाची खात्री न करता दिली व तेथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. हॉटेल व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब गव्हाळे व मालक या दोघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. हॉटेल व्यवस्थापक गव्हाळे यास न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हवालदार संतोष लांडे, गजानन गायकवाड, विजय धनेधर, केवलसिंह राजपूत, महिला पोलीस प्रियंका गुंड यांनी ही कारवाई केली.
शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉटेल, लॉजधारकांनी आपल्या मालकीचे, ताब्यातील हॉटेल, लॉजमध्ये वयाची खात्री न करता खोली देऊ नये. तसे निदर्शनास आल्यास यापुढे हॉटेल, लॉजचे मालक व चालक यांना पोक्सो कायद्यान्वये सह आरोपी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी