बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार आणि यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिल्याचा राग मनात धरून बलात्कारी आरोपींनी दुसऱ्या दिवशी पीडित मुलीच्या घरात घुसून तिच्यावर केलेल्या सशस्त्र जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेवर भाष्य करताना पीडित मुलीची छबी समाज माध्यमातून प्रसारित करणे उद्ध ठाकरे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांना चांगलेच अंगलट आले आहे. पीडित मुलीची छबी समाजा माध्यमातून प्रसारित करून तिची ओळख पटविल्याच्या आरोपाखाली खासदार राऊत यांच्या विरुद्ध बाललैंगिक शोषण कायद्याखाली बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात खासदार राऊत यांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत यांना असेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध तारतम्य न बाळगता भाष्य करणे चांगलेच अडचणीचे ठरले आहे. त्याचे असे झाले की, बार्शी तालुक्यातील एका गावात राहणारी आणि बारावीची परीक्षा देणारी पीडित अल्पवयीन मुलगी बार्शीत खासगी शिकवणी वर्ग संपल्यानंतर सायंकाळी गावाकडे दुचाकीने परत जात असताना वाटेत दोघा तरुणांनी तिला अडवून धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अक्षय विनायक माने (वय २३) आणि नामदेव सिद्धेश्वर दळवी (वय २४) या दोघांविरुद्ध पीडित मुलीने बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. परंतु पोलिसांनी दोन्ही आरोपींना वेळीच अटक न केल्यामुळे दोन्ही आरोपींनी पीडित मुलीच्या घरात घुसून, आमच्या विरूध्द फिर्याद देतेस काय, असे धमकावत तिच्यावर तलवार आणि सत्तूरने जीवघेणा हल्ला केला होता. त्याचे गंभीर पडसाद उमटले होते. परिणामी, त्याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणात संबंधित सहायक पोलीस निरीक्षक व दोन फौजदारासह एक हवालदार अशा चौघा पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे सरकारच्या विरोधात भाष्य करताना पीडित मुलीची छबीही प्रसारित केली. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणारे दोन्ही आरोपी भाजप पुरस्कृत असल्याचा शेराही राऊत यांनी मारला आहे. पीडित मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आरोपींनी पुन्हा तिच्यावर सशस्त्र जीवघेणा हल्ला केला आणि आता पुन्हा खासदार राऊत यांनी या घटनेवर सरकारला धारेवर धरताना तारतम्य न बाळगता पीडित मुलीची छबीही प्रसारित केल्यामुळे तिची जगासमोर ओळख जाहीर झाली आहे. हे कृत्य सुध्दा पीडित मुलीवरील अत्याचाराचाच भाग मानून खासदार संजय राऊत यांच्या विरूध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been registered against sanjay raut in solapur for tweeting a photo of a victim of torture vrd
First published on: 20-03-2023 at 13:03 IST