मुंबई : राज्यात कोव्हिशिल्ड लशीचा सुमारे ३३ लाख मात्रांचा साठा येत्या काही दिवसांत केंद्राकडून राज्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यात आरोग्य विभागाला दर दिवशी तीन लाख लोकांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  केंद्राकडे दर आठवडय़ाला २० लाख मात्रा पुरविण्याची मागणी केली होती. राज्यात प्राधान्यक्रम गटातील १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी दरदिवशी तीन लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. यासाठी एकूण २.२० कोटी मात्रांची आवश्यकता असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्राकडून येत्या काही दिवसांत कोव्हिशिल्डच्या ३३ लाख मात्रा राज्यात पुरविल्या जाणार आहेत.

‘येत्या आठवडय़ात केंद्राकडून ९ लाख मात्रांचा कोव्हिशिल्डचा साठा मिळणार असून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आणखी २३ लाख मात्रांचा साठा उपलब्ध होणार आहे. तेव्हा एकत्रितरीत्या सुमारे ३३ लाख मात्रांचा साठा प्राप्त होणार असून त्यानुसार दरदिवशी तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांचा साठा तरी उपलब्ध असून तुटवडा नाही,’ असे राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.

मात्रा वाया जाण्याचे प्रमाण ५.२ टक्के

लशीच्या मात्रा वाया जाण्याचे प्रमाण अद्यापही कमीच असून सध्या ५.२ टक्के आहे. सर्वसाधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत मात्रा वाया जातात असे मानले जाते. लशीच्या मात्रा कमीत कमी वाया जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Center will soon provide 33 lakh quantities of covishield vaccine to the state zws
First published on: 22-03-2021 at 01:31 IST