“केंद्र सरकारने सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेवर पुन्हा एकदा विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा लवकरच महाराष्ट्रामध्ये मनसेकडून आंदोलन उभे करावे लागेल.” असा इशारा मनसे प्रवक्ते आणि विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी आज (शनिवार) सांगली येथे दिला.

अमित ठाकरे यांच्या सांगली दौऱ्याच्या नियोजनासाठी गजानन काळे सांगलीत आले होते. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.

राज ठाकरे हेच पुढील धोरण स्पष्ट करतील –

याप्रसंगी गजानन काळे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अग्निपथ योजनेवर मनसे लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहे. मुलांचे शोषण करणं आणि त्यांची सेवाभावी वृत्ती संपवणे हे कोणत्याच सरकारचे धोरण नसावे अशी पक्षाची भूमिका आहे. मात्र, याबाबत आमचे नेते राज ठाकरे हेच पुढील धोरण स्पष्ट करतील.”

…हा कसला हिंदुत्ववाद? –

“अयोध्येला जाऊन काही ढोंगी आणि बेगडी हिंदुत्ववादी राम राम करतात आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्या औरंगजेबाच्या थडग्यापुढे जे नतमस्तक होतात त्यांची मदत घेतात. हा कसला हिंदुत्ववाद?” असा सवाल उपस्थित करून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर गजानन काळेंनी टीका केली.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालं का? याचे उत्तर द्यावे –

तसेच, “बाळासाहेब ठाकरे यांनी माझे सरकार आले तर मशिदीवरील भोंगे उतरतील असे वचन जनतेला दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मशिदीवरील भोंगे उतरलेत का? रस्त्यावरचा नमाज बंद झाला का? आणि या सगळ्या विषयांमध्ये औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालं का? याचे उत्तर द्यावे.” असेही काळे म्हणाले.