सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारकडून कठोर कायदे आणण्याची प्रक्रिया सुरु असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. देशात तालिबानी राजवट येत आहे का असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे.

सोशल मीडियावर सरकारविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राज्यातील अनेक तरुणांना पोलिसांनी नोटीस पाठवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरकारवर टीका केली. सोशल मीडियाद्वारे लोकांची मनं कलुषित करुन सत्तेवर येणाऱ्या भाजपवर हे अस्त्र उलटले असून आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदे आणण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सायबर सेलचे अधिकारी हे भाजपचे एजंट असल्याचा आरोपच त्यांनी केला.

गुरदासपूर आणि केरळमधील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. भाजपच्या पराभवाचा मला आनंद झाला नाही. मात्र देशातील जनमत बदलत असल्याचे यावरुन दिसते, असे त्यांनी सांगितले. मध्यावधी निवडणुकांची धमकी देत सरकार मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांवर दबाव टाकू शकत नाही असे त्यांनी भाजपला सुनावले आहे. लोकांनी पाच वर्षांसाठी आम्हाला निवडून दिले याचे भान आम्हाला आहे, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरील लिखाणावरुन नोटीस पाठवल्याने राज्यातील भाजप सरकार अडचणीत आले आहे. संजय राऊत यांच्यापूर्वी शरद पवार आणि राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली होती. सरकार विरोधात मते मांडणाऱ्या तरुणांची सरकार पोलिसांच्या माध्यमातून गळचेपी करीत असून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नाहक त्रास दिला जात असून अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा शरद पवार यांनीदेखील दिला होता.