जालना : छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात सांघिक पध्दतीने काम करण्याचा अनुभव पाठीशी असल्याने नागपूर येथील ‘एम्स’चे संचालन करताना तो अनुभव कामाशी येईल असे मत नागपूर ‘ एम्स’ चे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांनी येथे येथे सांगितले. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय शिक्षण आणि सुविधा देणाऱ्या नागपूर येथील ‘एम्स’ च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल डॉ० पंढरे यांचा सम्यक परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
आपल्या मूळ शहरातील सत्कार प्रसंगी बोलताना डॉ. पंढरे म्हणाले, नागपुर शहरातील ‘एम्स’ मध्ये दररोज सुमारे चार हजार जण तपासणीसाठी येतात. त्यातील ७५० रुग्ण दाखल करुन घेतले जातात. दोन महियांपूर्वी आपण जेव्हा या संस्थेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकाराला तेव्हा येथील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या ६० टक्के जागा रिक्त होत्या. नव्याने ५०७ जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे. या संस्थेत सांघिकपणे काम करू.
प्रमुख पाहुणे डॉ. विजय चौथाईवाले यावेळी म्हणाले की, कुठलीही संस्था चालविताना तेथील नेतृत्वाकडे त्याग, समर्पण, सांघिक भावना आणि सातत्य आवश्यक असते. अनेक प्रलोभने येऊनही डॉ. पंढरे यांनी हेडगेवार रुग्णालय सोडले नाही. स्पष्टवक्तेपणा, समोरच्यास जाणून घेण्याची हातोटी आणि सांघिक भावनेवर विश्वास ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे १९८८ मध्ये १५ खाटांचे असलेले छत्रपती संभाजीनगरमधील हेडगेवार कग्णालय सध्याच्या विस्तारित रुपात दिसत आहे .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवागिरी प्रांत चालक अनिल भालेराव यांची या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. भालेराव आणि सुनीता पेंढारकर यांची भाषणे यावेळी झाली. सम्यक परिवाराच्यावतीने अतुल वझरकर, विजय देशमुख आणि इतरांनी उपस्थितांचे स्वागत केले.