पंढरपूर : नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणत पाऊस पडल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. एकीकडे उजनी धरणातून येणारी पाण्याची आवक लक्षात घेवून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे वीर धरणातून देखील पाणी नीरा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे दोन्हीकडून आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, अवघ्या पंधरा दिवसांवर आषाढी यात्रा येऊन ठेपली आहे. त्यामुळे यात्रा काळात प्रशासनाला योग्य नियोजन करावे लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील दमदार पावसाने जिल्ह्यातील उजनी धरणात देखील झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून नीरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वीर धरणातून ६५३७ क्युसेक इतके पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नीरा नदीत सोडण्यात आलेले पाणी अकलूज येथील नीरा-भीमा संगम येथून पुढे भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीला मिळते. तसेच भीमा नदीपात्रामध्ये उजनी धरणामधून ३१ हजार ६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दुपारी चार वाजता चंद्रभागा नदीपात्रामध्ये ४० हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग प्रवाहित झाला आहे.

येथील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, सर्व संतांच्या पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. अनेक भाविक येवून चंद्रभागा नदीचे स्नान करून देवाचे दर्शन घेवून पायी वारी करतात. त्यामुळे भाविकांची गर्दी झाली आहे. भाविकांनी स्नान करते वेळी वाहत्या पाण्याचा अंदाज घ्यावा, काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर स्थिती होऊ नये म्हणून नियोजन : पालकमंत्री गोरे

अवघ्या पंधरा दिवसांवर आषाढी एकादशी आहे. या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे. २९ जूनपर्यंत उजनी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात कमी होईल. जर पाऊस पडला तर धरणात पाणी साठवता येईल, जेणेकरून नदी पात्रात पाणी सोडावे लागू नये. तसेच वीर धरणातून पण असेच नियोजन केले आहे, असे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.