पंढरपूर : येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मंदावला आहे. त्यामुळे नदीचे पाणी ओसरू लागले आहे. असे असले तरी नदी अद्याप दुथडी भरून वाहत आहे. तसेच वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली आहेत. नदी पात्रातील पाणी जवळपास दीड मीटरने कमी झाले आहे. त्यामुळे पुराचा धोका तूर्तास टळला आहे. शहरात पावसाचे साचलेल्या पाण्याचा निचरा आणि फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अनेक शहरात पूरसदृश स्थिती, नदी, नाले, कालवे, बंधारे भरून वाहत होते. मात्र, आता अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती तर काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्याने पावसाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे चंद्रभागा नदीत येणारा विसर्ग थोडा कमी झाला. पर्यायाने येथील चंद्रभागा नदी पात्रात मंगळवारी सकाळी दीड मीटरने पाणी पातळी कमी झाली. मात्र, येथील वाळवंटातील मंदिरे अद्याप पाण्याखाली आहेत. मात्र, पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टाळला आहे. तसेच पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने सामान्य जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
शहरात गेले तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. यंदा पालिकेने नालेसफाई केली नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. पालिकेने ज्या भागात पाणी साचले अशा काही ठिकाणच्या पाण्याचा निचरा तातडीने केले. मात्र, त्या ठिकाणी जंतुनाशक पावडर, फवारणी केली नाही. आरोग्य विभागाने तातडीने शहरात फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.