भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

“भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल,” असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकत असताना तो पक्ष सहाव्या जागेसाठी दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत असल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

“शिवसेनेने या निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे,” असे पाटील यांनी म्हटलंय.

शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी, “केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी आपण टिप्पणी करणार नाही,” असं उत्तर दिलं.

“तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला व कारवाई झाली हे विसरता येणार नाही. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवत नाही याचा संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमातून हा सात्विक संताप व्यक्त केला त्यांना त्यामुळे आनंदच झाला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा मुद्दा नाही. आपण जे मत व्यक्त केले त्याबाबतीत पराचा कावळा करू नये,” असंही चंद्रकांत पाटील यांनी कालच्या वक्तव्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना स्पष्ट केलं.