उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला आदेश मिळाला तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी शिवसेनेतल्या फुटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना जबाबदार ठरवलं. परंतु यावेळी त्यांनी पवारांच्या नावाचा उल्लेख टाळला. नामोल्लेख टाळला तरी त्यांचा रोख पवारांकडे असावा, असं म्हटलं जात आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “त्या एका माणसाने राज्यात निर्माण केलेला जातीयवाद, नेहमी निर्माण केलेली पक्षीय आणि जातीय फूट राज्यकर्त्यांच्या लक्षात का येत नाही. या फुटीमुळे निर्माण झालेलं पक्षीय नुकसान आपण बाजूला ठेवूया, परंतु यातून भांडणं निर्माण करून काही जण आपला स्वार्थ साधत आहेत.” ज्यांना हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जवळ घेतलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, असा टोला पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. पाटील टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “मी सर्वांना कामाला लावलंय”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले, “माझ्या दौऱ्याची…”

त्या माणसाने या महाराष्ट्रात दुहीची बीजं पेरली”

पाटील म्हणाले, त्या माणसाने या महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी दुहीची बीजं पेरण्याचं काम केलं. ती दुहीची बीजं पेरून राज्य चालवण्यातला छोटासा वाटा घेऊन मोठी कामं करून घेतली. ते या सख्ख्या भावांपेक्षा जवळचं नातं असलेल्यांमधलं (शिवसेनेचा ठाकरे आणि शिंदे गट) भांडण पाहून आनंदीत होत आहेत. ही गोष्ट त्या दोन सख्ख्या भावांना कळत नाही. परंतु आपण नुसते भांडत नाही आहोत, दुसऱ्याचा फायदा करून देतोच आहोत, पण हिंदुत्वाचं देखील मोठं नुकसान करत आहोत, ही गोष्ट त्यांना कळत नाही.