भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. जयंत पाटील यांनी भाजपाने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पहावं असा टोला लगावल्यासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाटील यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नका असं म्हणत संताप व्यक्त केला.

करोना काळात अविरत सेवा बजाविणाऱ्या दोन हजार स्वच्छ्ता कर्मचारी आणि ५०० वृत्तपत्र वितरकांचा कृतज्ञता सन्मान सोहोळा पुण्यातील नूमवी शाळेत आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळीच त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

जयंत पाटील असं म्हणालेत की भाजपाने हे सगळं राजकारण करण्यापेक्षा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी, “जयंत पाटलांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही,” असं म्हटलं.

“आम्ही काय करायचं हे ठरवायला आम्ही सक्षम आहोत, तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला इस्लामपूरच्या बाहेर सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकता आल्या नाहीत. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आर्यन खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आल्यानंतर आज सकाळीच अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करुन समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केलीय. यावरुनही चंद्रकांत पाटलांनी मलिक यांना सुनावलं आहे.

“संपूर्ण सरकार तुमच्या हातात आहे. एक गृहमंत्री (अनिल देशमुख) जरी जेलमध्ये गेलेत. दुसरे गृहमंत्री (दिलीप वळसे-पाटील) आजारी होते ते काल बरे झालेत. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे,” अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांना करुन दिलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “एसआयटी नेमा नाहीतर डबल एसआयटी नेमा. रोज सकाळी उठून ट्विट करा, प्रेस घ्या; म्हणजे मंत्रीमंडळातून तुम्हाला काढलेलं दिसतंय. मंत्रीमंडळातून काढलेल्या माणसानेच मागणी करायची असते,” असंही पाटील म्हणाले आहेत.