सांगली : आपल्याकडे अनेक पक्ष मालकांचे, तर भाजप कार्यकर्त्यांचा आहे. राष्ट्रवादी शरद पवारांचा, शिवसेना उद्धव ठाकरेंची, तर मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे. भाजप मात्र कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तासगावात केले. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचे यावरून वाद सुरू आहेत. यातूनच हे पक्ष कोणाच्या तरी मालकीचे असेच चालवले गेले आहेत. या पक्षाच्या मालकीबाबतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले. आज तासगावमध्ये भाजप कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पक्षांची यादी बघितली, तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे, तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा, मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे. मात्र, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजप विचारावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात अनेक नेते येऊन गेले, पक्ष मोठा केला, पक्ष चालत राहिला.’

भारतीय जनता पक्ष हा अडवाणी, अटलजी किंवा मोदीजींचा पक्ष नाही, तर कार्यकर्त्यांचा आणि देशहिताच्या विचाराचा पक्ष आहे. मोदीजींनी गेल्या दहा वर्षांत देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच सामाजिक बदलाची क्रांती घडवली. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात आले, कोट्यवधी घरांना गॅस व शौचालय सुविधा उपलब्ध करून दिल्या. कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा भारताशी पूर्ण एकात्म संबंध प्रस्थापित केला. देशहित, विकास आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करणे हेच आमचे हिंदुत्व आहे.

तासगाव तालुक्याचे राजकारण आतापर्यंत दोन व्यक्तींच्या पक्षाभोवती फिरत राहिले. यामधून तासगाव तालुक्याचा किती विकास झाला माहीत नाही, असे म्हणत भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मध्ये भाजपला आतापर्यंत कधीही भरभरून यश मिळाले नाही. तालुक्यातील काही लोकांचे मला पुन्हा पक्षात घेणार आहे की नाही, जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळणार आहे की नाही, अशी गणिते सुरू आहेत, असेही श्री. पाटील म्हणाले.

स्वप्नील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, युवक नेते वैभव पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.