गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेली करोना महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही, उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या, असे आवाहन भाजपाटे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले आहे. चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एकत्रित करोनाचा सामना करुयात असं म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यात करोनाचे संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी असे आपण सर्वजण एकत्रीतपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे आणि कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे .

सरकारची मर्यादा स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, शासकीय रुग्णालयांच्या बेड्सच्या संख्येची मर्यादा आहे. खूप मोठ्या संख्येनी रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे या परिस्थितीचा सामना करणं शक्य होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे सरसकट संशयाच्या नजरेने पाहणे चुकीचे आहे.
ते म्हणाले की, सध्या खासगी रुग्णालयांमध्ये करोनाचे रुग्ण खूप मोठ्या संख्येने उपचार घेत असल्यामुळे त्या रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेव्यतिरिक्त प्रतिदिन, प्रति बेड अशा निश्चित रकमेची शासनातर्फे थेट हमी देणे गरजेचे आहे.

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 1100 रुग्ण बरे झाले आहेत. आजही 400 रुग्ण उपचार घेत आहेत. असे असतानाही आजपर्यंत ६ महिन्यामध्ये सरकारकडून त्यांना फक्त 44,000 रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा तरी कशी ठेवायची, असा सवाल त्यांनी केला आहे.
समाजातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्तींना करोनाची लागण झाली त्या व्यक्तींनी प्रामुख्याने खासगी रुग्णालयातच उपचार घेऊन करोनावर मात केली आहे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.

ते म्हणाले की, सध्याचे संकट ध्यानात घेऊन दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ऑक्सिजन बेडसह सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सुविधा निर्माण करताना तेथे वैद्यकीय, निमवैद्यकीय व पूरक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. वैद्यक क्षेत्राच्या विविध शाखांचे डॉक्टर्स, वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी, परिचारिका, वॉर्डबॉय अशा एक लाख जणांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil uddhav thackeray coronavirus nck
First published on: 06-09-2020 at 15:20 IST