करोना महामारीत कोविडची लागण झाल्यानंतर, सिटी स्कॅन स्कोअर १८ असतांना रूग्णालयात मृत्युशी झुंज देत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ३९९ व्या रँकने उत्तीर्ण होण्याची किमया वरोरा येथील आदित्य जिवने या युवकाने साधली आहे. आज आदित्य आयएएस होताच त्याचेवर सर्वस्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

मूळचा वरोरा येथील रहिवासी असलेल्या आदित्य चंद्रभान जिवने याने सेंट एनिस कॉन्व्हेंट येथून २०११ मध्ये दहावी परीक्षा ९२ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. तेव्हा तो वरोरा तालुक्यातून प्रथम आला होता. त्यानंतर नागपूर येथे नारायणा विद्यालयातून सीबीएससी मध्ये बारावीची परीक्षा पास केली. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्याल, नागपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर विषयात पदवी प्राप्त केली. तिथून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली. पहिल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीत अपयश आले. मात्र या अपयशाने खचून न जाता आदित्यने पून्हा नव्या दमाने आयएएसची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात ३९९ व्या रँकने उत्तीर्ण झाला. मात्र त्यासाठी त्याला आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा द्यावी लागली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर त्याला करोनाची लागण झाली. एप्रिल महिन्यात देशात सर्वत्र करोनाचा हाहाकार असतांना आदित्य रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला उपचारार्थ दाखल केले होते. त्याचा सिटी स्कॅन स्कोअर १८ असतांना डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले. या काळात मृत्युशी दोन हात करण्याची हिंमत महाराष्ट्रातील दिल्लीत कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी स्वागत पाटील, हैद्राबाद पोलीस अधिक्षक महेश भागवत, मुंबई आयआरएस मध्ये कार्यरत नितीश पाथोडे व तामिळनाडूचे राज्यपाल यांचे सचिव आनंद पाटील यांनी सहकार्य केले. आज त्यांच्यामुळेच मी जिवंत आहे आणि आयएएस होऊ शकतो असे आदित्य लोकसत्ताशी बोलतांना म्हणाला. तसेच, मृत्यूशी दोन हात करून आपण परत आयुष्य मिळविले असाही तो म्हणाला.

आपल्या यशाचे श्रेय आदित्य आई, वडील, बहिण अनुजा व काका, मामा यांना देतो, आदित्यचे वडील चंद्रभान जिवने आनंदनिकेतन कॉलेज वरोरा येथे वाणिज्य विभागाचे प्रमुख आहेत. आई वरोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. तर बहिण अनुजा अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंशूमन यादव हा २४२ रँकने परीक्षा उत्तीर्ण –

चंद्रपूर येथील जटपूरा गेट येथे वास्तव्य असलेला व आता दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत अंशूमन यादव हा २४२ रँकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. अंशुमनचे वडील वेकोली मध्ये कार्यरत आहे. त्याने यशाचे श्रेय आई, वडील व कुटूंबियांना दिले.