चंद्रपूर जिल्ह्य़ाला स्वच्छ पाणी मिळणे तर दूरच, या जिल्ह्य़ात मोकळा श्वास घेण्यास शुद्ध हवाही मिळत नाही. विकासकामात हा जिल्हा किती तरी मागे पडलेला आहे. त्याला कारण येथील पालकमंत्री, आमदार, खासदार व अधिकाऱ्यांना दूरदृष्टी नाही, अशी टीका पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी येथे केली.
नदीच्या पात्रातील पाणी संपले असतानाही वर्धा नदीतून ३३ उद्योग पिण्याच्या पाण्याची उचल करत आहेत, त्याकडे जिल्हाधिकारी विजय वाघमारे, सिंचन विभागाचे अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. पाणीपुरवठामंत्री म्हणून मी महिन्यातून दोन दिवस या जिल्ह्य़ात येतो. पालकमंत्री संजय देवतळे या जिल्ह्य़ातील आहेत, असे सांगत त्यांनी जिल्ह्य़ाच्या पाणीटंचाईबाबत देवतळे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.  भविष्यात वर्धा नदीतून २८ उद्योग पिण्याच्या पाण्याची उचल करणार असल्याने परिस्थिती किती भयावह राहील, याचा विचारच न केलेलाच बरा, असे म्हणून त्यांनी विकासकामे न होण्यास स्थानिक अधिकाऱ्यांवर खापर फोडले. प्रदूषण व पर्यावरणाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. एकाही उद्योगात पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा नसल्याने नदीच्या काठावर असलेले उद्योग विषारी पाणी नदीच्या पात्रात सोडत असल्याने शेकडो गावकरी शुद्ध पाण्याऐवजी विष प्राशन करत आहेत. प्रदूषण इतके की, श्वास घेण्यास शुद्ध हवाही मिळत नाही. उद्योगांकडून पर्यावरणशिस्तीचा कुठलाही नियम पाळला जात नाही. गोंडवाना विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे. पंचशताब्दीनिमित्त शहरविकासासाठी दिलेल्या २५० कोटींच्या निधीवरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये श्रेय लाटण्याचे राजकारण सुरू आहे. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, २५० कोटींचे श्रेय द्या, मात्र विकासकामे करताना आम्ही एकत्र येणार नाही. त्याचा शहराला काय फायदा, याचे सोयरसुतक कोणत्याही पक्षाला नाही. जिल्हा परिषद, महानगरपालिकेतही तेच सुरू आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात राजुरा, वरोरा, भद्रावती व ब्रह्मपुरी येथे विभागस्तरावर टंचाई निवारणाच्या बैठका घेतल्या. केवळ दोन आमदार व अधिकारी हजर होते. पालकमंत्री गावात राहूनही बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे याचा काय अर्थ काढायचा, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय दिले, मात्र त्यावरूनही राजकारण सुरू आहे. एकूणच या जिल्ह्य़ाची राजकीय, सामाजिक व शैक्षणिक प्रकृती काही ठीक नाही. यात कुणालाही दोष देण्यात काही कारण नाही. जिल्ह्य़ातील लोकांना साधे पिण्याचे पाणी मिळत नसताना अधिकारी सुस्तावले असल्याची टीकाही त्यांनी केली.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वाधिक निष्क्रिय
पाणीपुरवठा विभागाचा मंत्री म्हणून राज्यात सर्वत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठका आयोजित करताना सकारात्मक प्रतिसाद मिळाला, मात्र येथील जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी बैठक आयोजनात सहकार्य केले नाही आणि ते स्वत:ही बैठकीला आले नाही. राज्यातील सर्वाधिक बोगस जिल्हाधिकारी, अशी वाघमारे यांची नोंद घेतली असून मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पालकमंत्र्यांच्या भीतीपोटी जिल्हाधिकारी बैठकीला गैरहजर राहिले असतील, मात्र आयोजनात सहकार्य करायला हवे होते. राज्यातील सर्वाधिक निष्क्रिय जिल्हाधिकारी येथे असल्याने जिल्हा माघारला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.