नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांत रुग्णांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. रुग्ण मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या मुद्द्यावरून सरकारवर परखड शब्दांत टीका केली. त्यावर आता सत्ताधारी बाजूने भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला आहे. “कोरोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही, आज साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्याचं पोस्टिंगचंही रेट कार्ड ठरवलं गेलंय असं कानावर येतंय. औषधं खरेदीसाठीही निविदा प्रक्रिया बंद होणार आहे. मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणार? निविदा प्रक्रिया बंद करून भ्रष्ट्राचाराचं दार उघडं केलं जातंय. आज सुद्धा जिथे जिथे औषधं खरेदी झालेली नाही तिकडे कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांवर बावनकुळेंनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट टाकून प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या सरकारच्या काळातील कोविड घोटाळ्यांवर कधी बोलणार की नाही? असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला आहे.
“उद्धवजी, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का?”
“उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.
“मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे! उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलंय. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वत: काही करायचं नाही. हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार!” असा टोला बावनकुळेंनी पोस्टमधून लगावला आहे.