Chandrashekhar Bawankule On OBC Sub Committee Meeting : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेलं आहे. याचं कारण म्हणजे २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढला. मात्र, या अध्यादेशामुळे ओबीसी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर अखेर राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीप्रमाणे ओबीसी उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आज या ओबीसी उपसमिती महत्वलाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींच्या कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली? तसेच ओबीसींसाठी कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले? याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज झालेल्या या बैठकीत ओबीसींच्या संदर्भातील १८ ते १९ वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या संदर्भातील जात प्रमाणपत्र देताना कोणत्याही पद्धतीत कादगपत्रावर खाडाखोड करून देण्यात येऊ नये. याबाबत अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे याबाबत बैठकीत चर्चा झाली. मंत्री छगन भुजबळ यांनी ९ ते १० महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी काही पुरावे दाखवले आणि कशा पद्धतीने जात प्रमाणपत्र देताना खाडाखोड होते हे सांगितलं. तसेच जे कोणी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नियमाप्रमाणे आहेत त्याबाबतही चर्चा झाली. चुकीच्या पुराव्यांवर प्रमाणपत्र दिले जाऊ नये. कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच देण्यात आले पाहिजेत या विषयांवर चर्चा झाली आणि जे नियमाप्रमाणे आहेत त्यांना कोणाचाही आक्षेप नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
कोणत्या विषयांवर चर्चा झाली?
“ओबीसी मंत्रालयाला जवळपास २९०० कोटींचं बजेट आहे, तेवढं बजेट ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे ओबीसीचे तब्ब्ल २२ उपमहामंडळ आहेत, त्या उपमहामंडळाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्या अर्थमंत्रालयाकडे सादर करणे, तसेच काही पदांचा अनुशेष भरण्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार अशा प्रकारे १८ ते १९ विषयांवर चर्चा झाली आहे. तसेच शिष्यवृत्तीची थकबाकी देण्यात यावी आणि ओबीसींसाठी जे वसतिगृह आहेत ते सर्व जिल्ह्यात असले पाहिजेत. तसेच ओबीसींसाठी विभागीय कार्यालय झालं पाहिजे, अशा विषयांवर चर्चा झाली, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.