Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : आज मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. तसेच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा अप्रत्यक्ष अ‍ॅनाकोंडा असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अजगर असा केला. त्यामुळे आता भाजपा आणि ठाकरे गटात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली. इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं, कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“आदरणीय अमित शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, ३७० कलम रद्द करून इतिहास रचतात. आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा उद्योग करतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. २५ वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय”, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

“उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करीत आहेत. उद्धव ठाकरे यांना मी एवढंच सांगू इच्छितो की, तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एकवेळ अशी येईल की, मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा अप्रत्यक्ष अ‍ॅनाकोंडा असा उल्लेख

मुंबईतील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज एकजण मुंबईत येऊन गेले. योगायोग म्हणजे आज मी सामनामध्ये दोन बातम्या वाचल्या. पहिल्या पानावर भाजपा कार्यालयाचं उद्धघाटन आणि दुसऱ्या पानावर एक बातमी होती, त्यामध्ये जिजामाता उद्यानात लवकरच अ‍ॅनाकोंडा येणार, आता आपण पेंग्विन आणलं म्हणून लाखो पर्यटक तिकडे वाढले आणि मला त्याचा अभिमान आहे. पण पेंग्विनच्या उंचीची काही माणसे आपल्यावर टीका करतात ते सोडून द्या. पण अ‍ॅनाकोंडा म्हणजे सर्व काही गिळणारा साप होय आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. मुंबई गिळायची का? पाहतो कशी गिळणार. नाही पोट फाडून बाहेर आलो तर नाव सांगणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“बरं भूमिपूजन करायला आला आहात तर भूमिपूजन करा, डोक्यावर नारळ फोडा किंवा दगडावर. कुठेही फोडा एकच आहे. मात्र, भूमिपूजन करतानाही घराणेशाहीवर टीका करता. मग तिकडे त्यांचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटने झालं का? मग घराणेशाही कोणाची ठाकरेंची? आरे उभा राहून दाखवा समोर, त्या अब्दालीला सांगायचंय आमच्या आई-वडिलांचे ऋण मानणारे पाईक आम्ही आहोत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.