भाजपात जाणाऱ्यांना रडवून रडवून सोडतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा वडेट्टीवारांना न्याय देईल, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
“महाविकास आघाडीत धाक दाखवून अजित पवार सर्व तिजोरी साफ करत होते. तीच धमक आता अजित पवारांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का? अजित पवार दिल्लीचे चरणदास झालेत. आता ते दादागिरी दाखवू शकत नाहीत,” असं वडेट्टीवारांनी म्हटलं.
हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ आरोपावरून शरद पवार गट ॲक्शन मोडमध्ये
“दिल्लीत त्यांनी तक्रार केली. आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले सुद्धा. तक्रारी पुरताच अजित पवारांना मर्यादित ठेवा. आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल, कारण, भाजपात जणाऱ्यांना रडवून रडवून सोडतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळे अजित पवारांवर आली असावी,” असं वडेट्टीवार म्हणाले.
यावर बावनकुळेंनी म्हटलं, “काळी काळ जाऊद्या वडेट्टीवारांना असा प्रश्न कुणीतरी विचारेल. ते विरोधी पक्षनेते आहे, पण काही काळात भाजपा वडेट्टीवारांना न्याय देईल. तेव्हा वडेट्टीवारांना कळेल भाजपा किती न्याय देते.”