पाकिस्तानातून सुटका झालेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात आज दुपारी आगमन झाले. याप्रसंगी शहरातील मनोहर टॉकीज समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज चंदू चव्हाण आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांना पाहून धुळ्यातील त्याचे नातेवाईक, मित्र आणि गावकरी प्रचंड भारावले. आपण चंदू चव्हाण यांच्या कुंटुबियांना दिलेला शब्द पाळला असून पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरुप सुटका करुन आज चंदू चव्हाण यांना घरी परत आणले असल्याची भावना डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आज सकाळी दिल्ली येथून केंद्रीय संरक्षणराज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यासोबत जवान चंदू चव्हाण, त्यांचा भाऊ जवान भुषण चव्हाण आणि आजोबा चिंधा पाटील हे इंदौर पर्यंत विमानाने आले. तेथून वाहनाने सर्व धुळ्यात दाखल झाले. दुपारी १२.४० वाजता धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर चौकात जवान चंदू चव्हाण यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतषबाजी, फुलांची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात जवान चंदू चव्हाण आणि केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांचे स्थानिक महिलांनी औक्षण केले. तसेच जमलेल्या सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि शेकडो नागरीकांनी जवान चंदू चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जवान चंदू चव्हाण याने अभिवादन केले. तसेच स्वागतासाठी जमलेल्या धुळेकरांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर विशेष वाहनाने चंदू चव्हाण आपल्या परिवारातील सदस्यांसह बोरविहिर या आपल्या गावाकडे रवाना झाला. ऐन होळी सणाच्या तोंडावर जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतला असल्याने धुळे तालुक्यातील बोरविहिर गाव आनंदाने न्हाऊन निघाले आहे. चंदू ज्या रस्त्याने गावात प्रवेश करेल त्या रस्त्यावर सडा, रांगोळी आणि औक्षण करून त्याचे स्वागत करण्यासाठी तरुणांसह महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली.
पाकिस्तानात जाऊन भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक केली होती. त्याच दरम्यान २९ सप्टेंबर २०१६ रोजी ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’ मधील जवान चंदू चव्हाणने नकळत भारत – पाकिस्तान मधील नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली होती. पाकिस्तान सरकारने २१ जानेवारी २०१७ रोजी चंदू चव्हाण यास भारत सरकारच्या स्वाधीन केले. जवळपास सहा महिन्यानंतर चंदू चव्हाण आपल्या गावी आज परतला. चंदू आपल्या गावी येणार म्हणून त्याचे मित्र, नातेवाईक, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्ष, समाजसेवक, संघटना यांनी त्यांचे स्वागत करण्याची तयारी केली.
केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर तसेच संरक्षण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केलेल्या प्रयत्नांतून पाकिस्तानने चंदूला भारताच्या स्वाधीन केले. केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी वाघा बॉर्डर येथे जाऊन चंदुला आपल्या ताब्यात घेत देशातील सैनिकांबद्दल असलेली आत्मीयता अधोरेखीत केली. तसेच आज स्वतः जवान चंदू चव्हाण याला धुळ्यात आणून कुटूंबियांच्या स्वाधीन करत तुमचा मुलगा सुखरुप आणण्याचे दिलेला शब्द पाळत असल्याचेही दाखवून दिले.