प्रल्हाद बोरसे

विकास आणि पर्यावरण यांच्या संघर्षात पर्यावरणाचीच कायम हानी होत असताना मालेगाव महापालिकेने विकास करतानाच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा चंग बांधून महाकाय वटवृक्षावर कुऱ्हाड चालविण्याऐवजी त्याचे पुनर्रोपण करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. महापालिकेच्या या प्रयोगास कृषिमंत्री दादा भुसे यांचीही भरभक्कम साथ लाभली. या प्रयोगाचे वृक्षप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

येथील सटाणा रस्त्यावरील महिला आणि बाल रुग्णालयाच्या विस्तारीकरण कामास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीस तेथील एक वटवृक्ष अडथळा ठरत होता. त्यामुळे हा वृक्ष तोडून टाकण्याच्या परवानगीसाठी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज सादर झाला होता. त्या अनुषंगाने उद्यान अधीक्षक नीलेश पाटील यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता साधारणत: २५ वर्षे जुन्या, ३५ फूट उंचीच्या हिरव्यागार आणि डौलदार महाकाय वृक्षावर कुऱ्हाड चालविणे योग्य होणार नाही, असे त्यांचे मत झाले.

या दरम्यान कृषिमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत महिला आणि बाल रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचे काम सुरू होण्यास होत असलेल्या विलंबाविषयी चर्चा झाली. त्यात इमारतीच्या बांधकामासाठी जुना वटवृक्ष तोडावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: भुसे, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी नियोजित इमारतीच्या बांधकामाबरोबरच वृक्ष वाचविण्यासाठी काय करता येईल, त्यावर विचार करणे सुरू केले. त्यानुसार प्रारंभी इमारतीच्या आराखड्यात बदल करण्यासाठीची चाचपणी झाली. परंतु, या वृक्षाची जागा टाळून इमारतीचा आराखडा करणे शक्य नसल्याची वस्तुस्थिती बांधकाम विभागाने मांडली. त्यानंतर वटवृक्षाचे अन्य जागेवर पुनर्रोपण करण्याचा पर्याय पुढे आला.

वटवृक्ष पुनर्रोपणासाठी महापालिकेने गुजरातच्या वडोदरा येथील बालाजी एंटरप्रायझेस या व्यावसायिक संस्थेची निवड केली. राजस्थानच्या वाळवंटात अशा प्रकारे वृक्ष पुनर्रोपण करण्याचा या संस्थेकडे दांडगा अनुभव आहे. प्रारंभी वटवृक्षाच्या फांद्या आणि पारंब्या छाटण्यात आल्या. मुख्य मुळांना इजा पोहोचणार नाही, अशा तऱ्हेने बुंध्याभोवती आणि खोल असा १० फूट जेसीबी यंत्राने खड्डा खोदण्यात आला. सर्व मुळे उघडे झाल्यावर क्रेनच्या साहाय्याने अलगदपणे उचलून वृक्ष एका ट्रॉलीवर आडवा ठेवण्यात आला. तत्पूर्वी वृक्षाच्या मुळांवर जैविक औषधांची फवारणी करण्यात आली. त्यांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून मुळे कापडाने व्यवस्थित गुंडाळण्यात आली.

मालेगाव कॅम्पातील म.स.गा. महाविद्यालयाच्या कुंपणालगत नव्यानेच झालेल्या जॉगिंग ट्रॅकजवळ या वटवृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यासाठी १० फूट लांब, १० फूट रुंद आणि १० फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला. पुनर्रोपणापूर्वी या खड्डयात आवश्यक त्या प्रमाणात पाणी, जैविक खत आणि कसदार माती टाकण्यात आली. वृक्ष पुनर्रोपणाचे हे काम सहा तासात पूर्णत्वास गेले. त्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला. पुनर्रोपण होऊन आता ३० पेक्षा अधिक दिवस उलटले असून या वटवृक्षाला नव्याने चांगले फुटवे येत असल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे अधोरेखित होत आहे. एकात्मता चौक ते म.स.गा. महाविद्यालय या रस्त्यावर दर्शनी भागात झालेल्या या वटवृक्षाचे पुनर्रोपण बघण्यासाठी उत्सुकता म्हणून लोक भेटी देत असून जणू काही हा वटवृक्ष पर्यटन केंद्र झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालेगावात वटवृक्षाचे पुनर्रोपण होण्याची ही एक आगळीवेगळी घटना आहे. त्यामुळे पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनासंदर्भात लोकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. अशा प्रकारे वृक्ष पुनर्रोपणासाठी भविष्यातही काळजी घेतली जाईल. – भालचंद्र गोसावी (आयुक्त, मालेगाव महापालिका)