राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच समता परिषदेच्या कार्यक्रमात सत्यशोधक समाजाविषयी बोलताना शाळांमधील सरस्वती पुजा बंद करा आणि महापुरुषांची पुजा करा, असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यावरून वादही झाला. भाजपाने राज्यभर छगन भुजबळांच्या या वक्तव्याविरोधात आंदोलन, मोर्चे काढलं. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. तसेच “मराठ्यांसह आम्ही सर्वजण शुद्र, आम्हाला ५,००० वर्षे का शिकू दिलं नाही?,” असा प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१३ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “माझ्या वक्तव्यांने वाद झाले. समता परिषदेची बैठक होती. शरद पवार त्याचे अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाला १५० वर्षे झाले म्हणून तो कार्यक्रम होता. सत्यशोधक समाजाच्या पुस्तकांमध्ये काय काय लिहिलं आहे हे यांनी वाचलं आहे का? त्यांना म्हणावं वाचा.”

“मराठ्यांसह आम्ही सर्वजण शुद्र, आम्हाला ५,००० वर्षे का शिकू दिलं नाही”

“मी काय म्हणालो, आम्हाला लहानपणापासून सांगतात की, सरस्वती विद्येची देवता आहे. मग ५,००० वर्षे आम्हाला का शिकू दिलं नाही. मराठ्यांसह आम्ही सगळे शुद्र होतो. बाकीचे अती शुद्र होते. ब्राह्मणांच्या मुलींनीही शिकायचं नाही, असे नियम होते,” असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं.

“पहिला शाळा निघाली आणि ब्राह्मणांनी पाठिंबा दिला”

भुजबळ पुढे म्हणाले, “अशावेळी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे पुढे आले. पहिला शाळा निघाली आणि त्यांना ब्राह्मणांनी पाठिंबा दिला. भिडे, चिपळूणकर, भांडारकर या सगळ्या मंडळींनी त्यांना पाठिंबा दिला होता. पहिल्या वर्गात सहा मुली आल्या. त्यातील चार ब्राह्मणांच्या मुली होत्या आणि एक धनगर, एक मराठा मुलगी होती. यांनी आपल्याला शिकवले.”

“शिकणाऱ्या मुलीला लाडूत विष घालून मारलं”

“डॉ. घोले म्हणून मोठे सर्जन होते. त्यांनी मुलीला शिकवायचं, शाळेत पाठवायचं म्हणत मुलीला पाठवलेलं. काही लोकांना ते पटलं नाही. त्या कोवळ्या मुलीला विषारी लाडू खायला दिला. त्यामुळे तिच्या शरीरात रक्तस्राव झाला आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुली, महिला शिकायला लागल्या,” असं भुजबळांनी नमूद केलं.

“ज्यांनी आपल्याला शिकवलं त्यांची पुजा करा”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “म्हणून मी सांगितलं की ज्यांनी राज्यक्रांती घडवली, अन्यायाविरोधात आवाज उठवला, आपल्याला खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळालं. फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई, भाऊराव पाटील, अण्णासाहेब कर्वे या सर्व मंडळींनी आपल्याला शिकवलं. यांची पुजा करा. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ट्रोलिंग झालं. माझ्या घरासमोर सरस्वती पुजा.”

हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेही काँग्रेसबरोबर गेले होते”, मनोहर जोशींसह तिघांची नावं घेत छगन भुजबळांनी सांगितली ‘ती’ घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१० वेळा सरस्वती पुजा करा, पण ती आपल्या घरात करा”

“मी सरस्वती पुजेला नाही कुठं म्हटलं, १० वेळा करा, पण ती आपल्या घरात करा. आमच्या घरातही पुजा करतात. मात्र, शाळेत लहानपणापासून या महापुरुषांचा इतिहास त्यांना सांगा. त्यांचं काम सांगा. म्हणजे विद्यार्थ्यांना कळेल की या शिक्षणासाठी या महापुरुषांनी काय केलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे,” असंही भुजबळांनी नमूद केलं.