हिंगोली : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली. गेल्या दोन महिन्यांत देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेत केली.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडली. ‘‘मी काही बोललो की, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटते, दोन समाजात तेढ निर्माण करतो. मात्र, त्यांच्या १५ सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहेत. मी आणि माझे कुटुंब दोन महिने या शिव्या वाचतो आणि ऐकतोय. आम्ही कसे जगायचे? ’’ असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

‘‘भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे जातनिहाय जनगणेनला अनुकूल आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही या मागणीला पाठिंबा आहे. जातनिहाय जनगणनेनंतरच अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींची शक्ती किती आहे, हे कळेल. बिहार जनगणना करू शकते, मग महाराष्ट्र का करू शकत नाही’’, असा प्रश्नही भुजबळ यांनी केला. सर्वांची जनगणना करा, सर्वांचे सर्वेक्षण करा आणि मगच मागासलेपण ठरवा, असेही भुजबळ म्हणाले. या वेळी प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, बबनराव तायवाडे, खासदार रामदास तडस, लक्ष्मण गायकवाड यांचीही भाषणे झाली.

हेही वाचा >>>मराठय़ांना नव्हे, तर झुंडशाहीला विरोध,मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन; गावबंदी फलक लावल्यास कायद्यानुसार गुन्हा

गावबंदीस कायद्याने मनाई’

गावबंदीचे फलक लावल्यास एक महिन्याची शिक्षा होऊ शकते, असा कायदा आहे. त्यामुळे गावबंदी करणाऱ्यांना एक महिना तुरुंगात कधी पाठविणार, असा सवाल भुजबळ यांनी केला. आमचा मराठ्यांना नव्हे, तर झुंडशाहीला विरोध असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवारांची पाठ

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी सभेकडे पाठ फिरवली. ते तेलंगणमध्ये प्रचारसभेला गेल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळ न्यायालयापेक्षा मोठे झाले आहेत का? भुजबळ यांच्या सभेला दंगल सभा, असे नाव हवे. कारण, जातीजातींमध्ये भांडणे लावण्याच्या उद्देशाने ही सभा झाल्याचे स्पष्ट दिसते.- मनोज जरांगे पाटील