अयोध्येतील राम मंदिरात उद्या (२२ जानेवारी) श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने देशभरातील अनेक मान्यवरांना, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, कारसेवक, उद्योगपती, क्रिकेटपटू, कलाकार आणि साधू-संतांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पंरतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्याला जाणार नाहीत.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही आज (२१ जानेवारी) अयोध्येला जाणार होतो. परंतु, आज केवळ आम्ही जाण्याऐवजी काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणार आहोत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजबांधवांना घेऊन मुंबईत धडक देणार आहेत. बीडमधून त्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा आणि आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या आंदोलनांनीदेखील राज्य सरकारला कोंडीत पकडलं होतं. त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात असल्यामुळे राज्य सरकार सावध आहे. मराठा मोर्चाचा धसका घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले नाहीत अशी चर्चा चालू आहे. यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, या अफवांना काही अर्थ नाही. अनेक लोक अयोध्येला गेले नाहीत. कित्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रणदेखील मिळालेलं नाही असं माझ्या वाचनात आलं आहे. परंतु, मंदिर समितीने इतर अनेकांना निमंत्रणं दिल्यामुळे सोमवारी तिथे खूप गर्दी असणार आहे. केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच कायदेशीरपणे निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकार जे काही बोलताय त्यात काही तथ्य नाही. उलट मुख्यमंत्री म्हणाले आहेत की, तिथली गर्दी कमी झाली की, आपण संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्येला जाऊ.

हे ही वाचा >> “आम्ही आज अयोध्येला जाणार होतो, पण…”, अजित पवारांनी सांगितलं प्राणप्रतिष्ठेला न जाण्याचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…म्हणून मुख्यमंत्री २२ जानेवारीला अयोध्येला जाणार नाहीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे, अयोध्येमध्ये सोमवारी श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.